महाबळेश्वरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक: दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कुमार शिंदे यांची अडीच लाखांची मदत!
महाबळेश्वर, १२ ऑगस्ट: महाबळेश्वर शहरातील स्थानिक काळी पिवळी टॅक्सी चालक संघटनेच्या वतीने सध्या श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे, जे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक सुंदर उदाहरण आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने, टॅक्सी संघटनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे श्री दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि टॅक्सी युनियनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या दातृत्वासाठी ओळखले जाणारे कुमार भाऊ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी कुमार शिंदे यांना मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, कुमार शिंदे यांनी आज मंदिराच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि मंदिराच्या उभारणीसाठी अडीच लाख रुपयांची भरघोस आर्थिक मदत जाहीर केली. त्यांच्या या योगदानामुळे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

या प्रसंगी धनगर समाजाचे नेते प्रशांत आखाडे आणि मुस्लिम समाजाचे तरुण समाजसेवक अल्ताफ भाई मानकर हे विशेषत्वाने उपस्थित होते. याशिवाय, मंदिर समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष यशवंत भिलारे, उपाध्यक्ष अखिल पटेल, माजी अध्यक्ष अशोक ढेबे, मंदिर समितीचे तुकाराम शिंदे आणि इतर सदस्यही उपस्थित होते. कुमार शिंदे यांच्या या दातृत्वामुळे महाबळेश्वरमधील सामाजिक सलोखा आणि एकोपा अधिक दृढ झाला आहे.




