महाबळेश्वर पालिकेकडून ‘उत्कृष्ट सफाई कर्मचारी’ पुरस्काराने विशाल लालबेग यांचा गौरव.
महाबळेश्वर, ८ ऑगस्ट २०२५: महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने शहराची स्वच्छता राखण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दर महिन्याला ‘उत्कृष्ट सफाई कर्मचारी’ पुरस्कार दिला जातो. याच उपक्रमांतर्गत, जुलै २०२५ महिन्यासाठीचा ‘उत्कृष्ट सफाई कर्मचारी’ पुरस्कार श्री. विशाल मीनाबाई कल्ली लालबेग यांना प्रदान करण्यात आला.
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा पुरस्कार वितरण सोहळा आज, ८ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. श्री. योगेश पाटील यांच्या शुभहस्ते विशाल लालबेग यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारात सन्मानपत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र ग्रंथ, गृहोपयोगी वस्तू आणि पुष्पगुच्छ यांचा समावेश होता.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शहर स्वच्छ ठेवण्यात सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळेच आपण ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकलो आहोत.” तसेच, पुढील अभियान कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ढोबळे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्री. अमित माने, पाणीपुवठा व स्वच्छता अभियंता श्री. प्रदीपकुमार बोरगे, संगणक अभियंता श्री मंगेश माने, आरोग्य निरीक्षक श्री. प्रमोद कुंभार, स्थापत्य अभियंता श्री. मुरलीधर धायगुडे, वृक्षाधिकारी श्री. कल्याण हिवरे, लेखापाल ज्ञानेश्वर मोहिते, लेखापरीक्षक श्री. सचिन कदम, स्वच्छता मुकादम श्री. मनोज चव्हाण व अयुब वारुणकर, तसेच हिलदारीचे श्री. राम भोसले व त्यांची टीम यांचा समावेश होता.
