महाबळेश्वर नगरपरिषदेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन
महाबळेश्वर: महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून यंदाही शहरात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षीच्या यशानंतर या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धकांनी शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसवणे अनिवार्य आहे. सजावटीसाठी थर्माकॉल आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. स्पर्धकांना त्यांच्या घरातील कचरा ओला, सुका, घरगुती घातक आणि बायोमेडिकल अशा चार प्रकारांत वर्गीकरण करून नगरपालिकेच्या घंटागाडीत दिल्यास त्यासाठी विशेष गुण दिले जातील. तसेच, उत्सव काळात फटाके टाळण्यावर आणि प्रदूषणमुक्त वातावरणावर भर देण्यात आला आहे.
स्पर्धकांनी आपल्या घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करत असल्यास त्याचेही विशेष गुण दिले जातील. तसेच, विसर्जनाच्या दिवशी सर्व निर्माल्य नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणीच जमा करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, इच्छुक स्पर्धकांनी २९ ऑगस्ट २०२५ पूर्वी प्रसिद्धीपत्रकावर दिलेल्या QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. यामध्ये, प्रथम पारितोषिक म्हणून ५००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक म्हणून ३००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक म्हणून १००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल. यासोबतच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
