महाबळेश्वरात लाखोंचा गुटखा जप्त : चार आरोपींवर गुन्हा
महाबळेश्वर │ शहरातील गुटखा व पानमसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीवर अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखोंचा साठा जप्त केला. २९ ऑगस्ट रोजी मुख्य बाजारपेठेतील आंबेडकर चौक परिसरात टाकलेल्या या धाडीत नामांकित ब्रँडचा गुटखा व पानमसाला मिळून आला.
धाडीत विमल, राजनिगंधा, तुळशी, शॉर्ट ९९९, टूडेपॉ, हिरा पानमसाला आणि एम.एस. पानमसाला या ब्रँडचा मोठा साठा जप्त झाला. जप्त मालाची किंमत वीस हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी बिलाल निजाम बैपारी (४७), मोहमद रफिक मुलाणी (६५), सरिफ मकबूल बैपारी (५५) आणि सिद्दीकन रियाज मेमन (३९) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गवळी मोहल्ला, स्कूल मोहल्ला आणि मरी पेठ परिसरातील रहिवासी असून तेच या मालाचे विक्रेते असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपींवर भा.दं.वि. कलम 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा व मानदंड अधिनियम 2006 आणि प्रतिबंध अधिनियम 2011 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका नामदेव वाईकर यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली असून, जप्त माल न्यायालयीन आदेशानंतर नष्ट करण्यात येणार आहे. आरोपींवर कठोर कारवाई होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.या कारवाईनंतर महाबळेश्वरात मोठी खळबळ उडाली आहे.
