महाबळेश्वर पीएम-श्री मुलींच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात जुई डोईफोडे शालेय मुख्यमंत्री तर कु.संस्कृती चोरगे या उपमुख्यमंत्री
“लोकशाहीचे धडे लहान वयापासून”
महाबळेश्वर (प्रतिनिधी):विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती लहान वयापासून मिळावी या उद्देशाने महाबळेश्वर येथील पीएम-श्री नगरपालिका मुलींची शाळा क्र. २ मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. या उपक्रमामुळे जबाबदार व सुजाण नागरिक घडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले.
निवडणुकीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी दि. २२ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज, अंतिम यादी, चिन्ह वाटप, प्रचार, मतदान व मतमोजणी अशा सर्व टप्प्यांची अंमलबजावणी करण्यात आली. मतदानपत्रिका, मतदार यादी, मतदार स्लिप व मतदान कक्षांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
१३ उमेदवार रिंगणात चौथी व पाचवीतील १३ विद्यार्थिनींनी मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली. मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदान पार पडले. इयत्ता १ ली ते ५ वी मधील सर्व विद्यार्थिनींबरोबरच प्रशासक व मुख्याधिकारी योगेश पाटील, नायब तहसीलदार मा. शेख, केंद्रप्रमुख नामदेव धनावडे, मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, सह्याद्री टेकर्स संस्थापक संजय पारठे, बीएलओ सुपरवायझर दत्ता वागदरे, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जुई डोईफोडे शालेय मुख्यमंत्री मतमोजणी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यामध्ये कु. जुई डोईफोडे यांची शालेय मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, तर कु. संस्कृती चोरगे या उपमुख्यमंत्री म्हणून निवडल्या गेल्या.
उपक्रमाच्या यशासाठी विशेष प्रयत्न मतदान अधिकारी म्हणून संगिता ढेबे, दीप्ती ढेबे, मनिषा कुरुंदे व कु. आरती ढेबे यांनी काम पाहिले. तर मुख्याध्यापिका ज्योती काळे, लक्ष्मण महाडिक, संतोष शिंदे, सलोनी यादव, अध्यक्ष नवनाथ डोईफोडे व सदस्य संजय पारठे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
