महाबळेश्वर नगरपरिषदेने ‘नमस्ते दिवस’ साजरा करत सफाईमित्रांच्या सुरक्षेला दिले प्राधान्य
महाबळेश्वर, १६ जुलै २०२५: केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय व केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ‘नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ (NAMASTE) योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने आज, १६ जुलै २०२५ रोजी ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा केला. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सांडपाणी आणि सेप्टिक टँक साफसफाई कर्मचाऱ्यांच्या (SSWs) सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला महत्त्व देण्यात आले.
‘नमस्ते’ योजनेचा मुख्य उद्देश स्वच्छता कामांमध्ये शून्य मृत्यूचे उद्दिष्ट साध्य करणे आणि या कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. याच अनुषंगाने, आजच्या ‘नमस्ते दिना’निमित्त ड्रेनेज आणि सेप्टिक टँकची सफाई करणाऱ्या ‘सफाईमित्र’ यांना स्वसंरक्षणाची साधने वापरण्याबद्दल, काम करताना आरोग्याची काळजी घेण्याबद्दल आणि त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ठोबळे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्री. अमित माने, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्री. प्रदीपकुमार बोरगे, आरोग्य निरीक्षक श्री. प्रमोद कुंभार, स्थापत्य अभियंता श्री. मुरलीधर धायगुडे, वृक्षाधिकारी श्री. कल्याण हिवरे, लेखापाल ज्ञानेश्वर मोहिते, लेखापरीक्षक श्री. सचिन कदम, स्वच्छता मुकादम श्री. मनोज चव्हाण, हिलदारीचे श्री. राम भोसले व त्यांची टीम, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या ‘नमस्ते दिना’च्या आयोजनामुळे महाबळेश्वर नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रदर्शन केले आहे, ज्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि सन्मान जपला जाईल अशी अपेक्षा आहे.
