महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५ ते २८ जून २०२५ दरम्यान झालेल्या ९ लाख ९० हजार ८५० रुपयांच्या चोरीप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी हॉटेलमधीलच एका कर्मचाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचे सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर आणि भांडी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेला ट्रक व टेम्पो असा एकूण १७ लाख ९० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल ऑक्सिजनमधून अज्ञात चोरट्याने सुमारे ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आणि भांडी लंपास केली होती. या गंभीर घटनेची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक अरुण देवकर (स्थानिक गुन्हे शाखा) आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर (महाबळेश्वर पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर आणि महिला उपनिरीक्षक रूपाली काळे यांच्या अधिपत्याखालील या पथकांनी घटनास्थळी जाऊन फिर्यादी, साक्षीदार आणि आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली. तांत्रिक तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी हॉटेलमधील एका कामगारानेच केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संशयित आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली. ६ जुलै रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, संबंधित आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहे. तात्काळ कारवाई करत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाने, रवी वेर्णेकर आणि नवनाथ शिंदे यांना मुंबई विमानतळावर जाऊन आरोपीला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.
या पथकाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे धाव घेतली आणि सहार पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीला चेक-इन करतानाच ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याने चोरी केलेला माल साताऱ्यातील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ आरोपी कान्चन बॅनर्जी याच्यासोबतच त्याचे साथीदार भंगार व्यावसायिक करण घाङगे आणि गौतम घाङगे यांना अटक केली. त्यांच्या गोदामातून चोरी केलेले ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, भांडी तसेच चोरीचा माल नेण्यासाठी वापरलेला ८ लाख रुपये किमतीचा ट्रक व टेम्पो असा एकूण १७ लाख ९० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित कार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार, आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
