महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही!
महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आज, दि. १० डिसेंबर २०२५, रोजी दुपारी ३:०० वाजता संपली. मात्र, या मुदतीत कोणत्याही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र (नामांकन अर्ज) मागे घेतले नाही. यामुळे निवडणुकीतील चुरस कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्र. रानिआ-२०२५/सुनिका / नप/प्र.क्र.१४/का-६ दिनांक २९/११/२०२५ नुसार निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार, माननीय जिल्हाधिकारी, सातारा यांनी ०४/१२/२०२५ रोजी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसारच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज (१०/१२/२०२५) निश्चित करण्यात आली होती.
उद्या, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी, निवडणूक लढवणाऱ्या सर्व अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. निवडणूक चिन्हे नेमून दिल्यानंतर, अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
या निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात आहेत, याची अधिकृत माहिती निवडणूक चिन्ह वाटपाच्या वेळी स्पष्ट होईल. उमेदवारांनी माघार न घेतल्याने महाबळेश्वर नगरपरिषदेची निवडणूक अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.



