मेढ्यात अबू आझमीचा निषेध भाजपा जावलीचे मेढ्यात जोडे मारो आंदोलन.
केळघर प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी औरंगजेबाचे उद्दातिकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा मुद्दाम प्रयत्न केला आहे. त्यामुळे विधानभवनात व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हिंदू व शिवप्रेमींच्या भावना भडकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा जावली तालुक्याच्या वतीने मेढ्यात आज जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अबू आझमी यांनी विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून औरंगजेबाचे तसेच टिपू सुलतानाचे उदात्तीकरण केले होते. यामुळे विधानभवनात गदारोळ झाला होताच. मात्र महाराष्ट्र राज्यातील जनतेत व शिवप्रेमींत सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत . याच पार्श्वभूमीवर भाजपा जावली तालुक्याच्या वतीने मेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अबू आझमीच्या यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन लिहिले असून ते निवेदन जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांना दिले आहे. या निवेदनात म्हणले आहे की, आजच्या स्वातंत्र्य भारत देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याबद्दल जनतेला खुप आदर आहे. परंतु महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अस्थीर करण्यासाठी काही समाजकंटक हिंदू धर्मावर अन्याय केलेल्या औरंगजेब, टिपू सुलतान यांचे फोटो स्टेटसला ठेवून त्यांचे गोडवे गाऊन त्यांचे उदात्तीकरण करत आहेत. त्यामुळे हिंदू समाजाच्या मनात रोष वाढून ठिकठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
अबू आझमीमुळे जनतेची भावना भडकली असून अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या पवित्र अशा कायदेमंडळाची सदस्य म्हणून राहता कामा नये. अन्यथा मोठ्या लोक भावनेच्या उद्रेकास सरकारला सामोरे जावे लागेल. तरी अबु आझमीचे तात्काळ निलंबन करावे. तसेच अशा प्रवृत्तीनवर दखल पात्र गुन्हे दाखल करता यावेत असेही या निवेदनात म्हणले आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे यांच्यासह विकास देशपांडे, संजय सपकाळ, मारुती चिकणे, हणमंत शिंगटे, अंकुश बेलोशे, दत्तात्रय किर्दत, प्रवीण गाडवे, शिवाजीराव देशमुख, हणमंत शिंगटे यांसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
