त्यागाच्या भावनेतून गरजूंनाही संधी द्या- वैभव राजेघाटगे खटावमध्ये एम. आर. शिंदे यांचा स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान
खटाव, ता. ३१ : समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाने त्याग आणि औदर्याची भावना दाखवून गरजूंना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पुढील पिढीला संस्कार आणि प्रेरणा देण्यासाठी सामाजिक भान जपण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव (गृह) वैभव राजेघाटगे यांनी व्यक्त केले.
येथील तालुका पत्रकार संघ व विविध सार्वजनिक मंडळाच्यावतीने माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात आयोजित व्याख्यानात ‘देणे समाजाचे, नाते कृतज्ञतेचे’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुभाष बोराटे, अरुण आदलिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. राजेघाटगे म्हणाले,‘‘ जी लोकं दुसऱ्याच्या समाधानासाठी जगतात, ती आरोग्यदायी आणि आनंदी राहतात. आनंदी जीवन जगण्यासाठी श्रीमंती नव्हे तर संस्कार महत्त्वाचे असतात. माणसाने पैशात आनंद न शोधता साध्या- साध्या गोष्टीतून तो मिळवायला शिकले पाहिजे. यासाठी दातृत्त्वाचा भाव आणि मनाचा मोठेपणा टिकवता आला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मातीत सामाजिक कार्य करून तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.’’
नितीन शिंदे यांनी स्वागत केले. पत्रकार अविनाश कदम यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार संजय देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रदीप विधाते, बाळासाहेब शिंदे, किशोर काळोखे, विलास भोसले, जीवन इंगळे, रसूलभाई मुल्ला, नारायण मुळे, किशोर डंगारे, मोहन कचरे, मोहन घाडगे, प्रा. मेहबूब शेख, प्रा.गंगाराम शिंदे, विजयराव बोर्गे, मुगुटराव पवार, अमिन आगा, रमेश अडसूळ, परशुराम बनकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा गौरव
या वेळी क्रीडा, सामाजिक, महिला सक्षमीकरण, संशोधन आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या रघुनंदन मुळे, संगीता दरेकर, दाऊद शेख, कुमार गुरव, मनीषा इगावे, नूरजहॉन शेख, संध्या शेडगे, ओम कुदळे, विराज देशमुख, रूपाली झिरपे यांचा सन्मानचिन्ह, शाल, भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास पुस्तकेही भेट देण्यात आली.