लोकनायक पुरुषोत्तम जाधवसाहेब : समाजसेवेचा दीपस्तंभ – वाढदिवस विशेष
सातारा (अली मुजावर) – संघर्षातून समाजकार्यापर्यंतचा पुरुषोत्तम जाधवसाहेबांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
खंडाळा तालुक्यातील अतीट या छोट्याशा गावात जन्मलेल्या पुरुषोत्तम जाधवसाहेबांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्ष, आत्मविश्वास आणि समाजासाठी झटण्याची अखंड जिद्द यांचा प्रेरणादायी संगम आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर सुरुवातीला पोलीस खात्यात नोकरी मिळवली. सुरक्षित सरकारी नोकरी असतानाही समाजासाठी काहीतरी भरीव करावे, ही तळमळ त्यांच्या मनात सतत होती.
याच भावनेतून त्यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडून समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून त्यांनी पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अपंगांना मोफत कृत्रिम अवयवदान, तरुणांना पोलीस व सैन्य भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे.
सन २००९ पासून त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या, समाजकार्याचा वसा त्यांनी कधीही सोडला नाही. ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या स्पर्धेत सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून जिल्ह्याचा मान उंचावला. कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी स्वखर्चाने पीपीई किट, औषधे व आवश्यक साहित्याचे वाटप करून माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने लढणारे, युवकांचे आदर्श नेतृत्व आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व म्हणून पुरुषोत्तम जाधवसाहेबांची पश्चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. राजकारणात नव्हे, तर समाजाच्या मनात विजय मिळवलेला हा लोकनायक आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
समाजसेवेचा वसा अखंड जपत मार्गक्रमण करणाऱ्या आदरणीय लोकनायक पुरुषोत्तम जाधवसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!




