कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये लॅम्प लाइटिंग समारंभ भव्य उत्साहात ; विद्यार्थिनींची उज्ज्वल शैक्षणिक कामगिरी
सातारा : कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये दिनांक 29 नोव्हेंबर रोजी नर्सिंग व्यवसायातील समर्पण, सेवा आणि निष्ठेचे प्रतीक असलेला लॅम्प लाइटिंग समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कार्यप्रेरणेवर आधारित हा सोहळा नर्सिंग विद्यार्थिनींच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात दर्शवणारा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. यानुसार प्रथम वर्ष GNM च्या विद्यार्थिनींनी दिव्य प्रज्वलित करून नर्सिंगची शपथ विधिपूर्वक ग्रहण केली.
समारंभास डॉ.सुरेश शिंदे, डायरेक्टर – सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर तसेच डॉ. रसिका गोखले, मेडिकल ऑफिसर – गोडोली यांची मान्यवर उपस्थिती लाभली. दोन्ही मान्यवरांनी नर्सिंग विद्यार्थिनींशी संवाद साधत सेवाभावी वृत्ती, मानवी मूल्ये आणि रुग्णसेवेतील सदाचार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास कनिष्का ज्ञानपीठ आरोग्य शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. निलेश थोरात व उपसचिव डॉ. रश्मी थोरात यांनीही उपस्थित राहून विद्यार्थिनींचे मनोबल वाढवले. त्यांनी आपल्या भाषणात नर्सिंग क्षेत्रात वाढत्या संधी, व्यावसायिक प्रामाणिकता आणि कौशल्यविकासाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी ज्ञानासोबतच सहानुभूती व संवेदनशीलता आत्मसात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
MSBNPE अंतर्गत उत्तुंग यश — ANM व GNM दोन्ही अभ्यासक्रमात 100% निकाल
या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे MSBNPE अंतर्गत आयोजित उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार वितरण सोहळा.
यावर्षी ANM वर्गात १००% निकाल लागल्याने विद्यार्थिनींचा उत्साह दुणावला. विशेषत: आरजू मानेर हिने (483/600) 80.50% गुण मिळवत महाराष्ट्र बोर्डात द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या यशाबद्दल शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले.
GNM अभ्यासक्रमातील सर्व वर्षांनीही कठोर परिश्रम, शिस्तबद्धता आणि समर्पित अभ्यासामुळे १००% निकाल प्राप्त केला.
तृतीय वर्षात 3 डिस्टिंक्शन, 4 फर्स्ट क्लास आणि 3 सेकंड क्लास असे उत्कृष्ट निकाल लागले.
द्वितीय वर्षात 1 डिस्टिंक्शन, 13 फर्स्ट डिव्हिजन व 8 सेकंड डिव्हिजन,
तर प्रथम वर्षात 4 फर्स्ट डिव्हिजन आणि 17 सेकंड डिव्हिजन अशा गुणवान यशाची नोंद झाली.
या सलग मिळणाऱ्या उल्लेखनीय निकालांमुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि अध्यापकवर्गाचे परिश्रम स्पष्टपणे जाणवतात. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून आधुनिक तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक प्रशिक्षण व नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगने मिळवलेले हे उज्ज्वल यश संस्थेचे नाव जिल्ह्यात आणि राज्यात अधिक गगनभरारी घेत असल्याचे द्योतक ठरले आहे. विद्यार्थिनी, पालक व शिक्षकवर्गामध्ये या कामगिरीबद्दल प्रचंड समाधान व आनंद व्यक्त होत आहे.




