कुमार शिंदे व टीमला भरघोस मतांनी विजयी करा :ना. शंभूराज देसाई
महाबळेश्वर, दि. २८ (प्रतिनिधी) : आत्तापर्यंत पर्यटन मंत्री म्हणून महाबळेश्वरवासियांनी जे जे मला मागितलं ते ते मी दिलं, आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी मागत आहे. मला नाराज करू नका. कुमारभाऊ शिंदे व आपल्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या. पालकमंत्री म्हणून सांगेल तेव्हा महाबळेश्वरवासियांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीस्थान नगर विकास आघाडी (नियोजित) तर्फे कुमार शिंदे व त्यांच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी ते महाबळेश्वर येथे आले होते. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ना. शंभूराज देसाई पुढे बोलताना म्हणाले, महाबळेश्वरचा खरोखर विकास करायचा असेल तर पर्यटन खाते व नगर विकास खाते महत्त्वाचे आहे. ही दोन्ही खाती आमच्याकडे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्याकडे आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे हे माझ्याकडे कामाचा पाठपुरावा नेहमी करतात. मी ही ती कामे पूर्ण करतो. बाजारपेठेचे सुशोभीकरण करताना व्यापाऱ्यांची चार फूट घरे, दुकाने जाणार होती. हे कुमार शिंदेंनी माझ्या नजरेस आणून दिले. त्यावेळी मी तात्काळ हा निर्णय बदलला. स्थानिकांच्या पोटापाण्याचा विचार न करणारा विकास काय कामाचा? विकास करताना लोकांचे नुकसान होता कामा नये. लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी लोकांच्या बाजूने उभा राहणारा हा पालकमंत्री आहे. बाजारपेठेच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा करायचा आहे. त्या कामाला मी मंजुरी दिली आहे. वनविभागाच्या आडमुठेपणामुळे वेण्णा लेक येथील व्यापाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु लवकरच या लोकांचे त्याच जागी मी पुनर्वसन करणार आहे. जागतिक पर्यटन स्थळांच्या नकाशात महाबळेश्वरला स्थान मिळवून देणार आहे.
यावेळी बोलताना माजी सभापती अमित कदम म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर ही माय भूमी आहे. जर शिंदे साहेबांच्या प्रतिष्ठेला धक्का लागु द्यायचा नसेल तर शिंदे साहेबांचे शिलेदार कुमार भाऊ शिंदे व त्यांच्या टीमला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.
या बैठकीत बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी महाबळेश्वर मधील निवडणूक ही सध्या’ ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी झाली आहे. विरोधी उमेदवाराला कसलाही अनुभव नाही. मी का नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे हे देखील त्यांना सांगता येत नाही. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर महाबळेश्वर शहराचा १०० कोटी रुपयांचा आराखडा करण्याचे धाडस आम्ही केले. त्यापैकी ५१ कोटी रुपये आले देखील. महाबळेश्वर मधील रस्त्यांच्या विकासासाठी ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव केला शिंदे साहेबांनी तो तात्काळ मंजूर केला. त्यापैकी ८० टक्के कामे पूर्ण देखील झाली. आम्ही कामाचा लेखाजोखा दाखवून लोकांना मत मागतो. रात्री बारा वाजता देखील हाक मारली तरी मी येतो. माझ्या गाडीची काच नेहमी खाली असते. दहा टक्के राजकारण व ९० टक्के समाजकारण करणारा मी व्यक्ती आहे. महाबळेश्वरचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले, गिरिस्थान विकास आघाडीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




