किनई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा -किनई (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना तसेच संजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
हे शिबिर शिवाजी चौक, किनई येथे घेण्यात आले असून तब्बल ६० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, इसीजीसह सर्वसाधारण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन दिले तसेच पुढील उपचारांविषयी आवश्यक सल्लाही दिला.
ग्रामीण भागात अशा प्रकारची मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले. स्थानिकांनी शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळ व संजीवनी हॉस्पिटल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
