कर्मवीर गीत गंधालीने भरले जागतिक मराठी संमेलनात रंग
प्रा. संभाजी पाटील यांच्या श्रवणीय गायकीतून उभे राहिले कर्मवीर चरित्र
सातारा दि. १० जानेवारी २०२५ –जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे सुरू असलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या विसाव्या जागतिक मराठी संमेलनात प्रारंभीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन संघर्षाचे गीतमय कथन करणाऱ्या प्रा. डॉ. संभाजी पाटील यांच्या ‘कर्मवीर गीत गंधाली कार्यक्रमाने उपस्थित यांना मंत्रमुग्ध केले.
विसाव्या जागतिक मराठी संमेलनाची सुरुवात कर्मवीर गीत गंधाली या कार्यक्रमाने झाली. यावेळी उपस्थित असलेल्या देश-विदेशातील मान्यवरांना या कार्यक्रमातून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राचे दर्शन या कार्यक्रमातून झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रा. डॉ. संभाजी पाटील यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव व माजी सनदी अधिकारी विकास देशमुख व संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील संघर्षमय, हृदयद्रावक घटना प्रसंगांची गुंफण काव्यामध्ये करून त्याचे गीतरुप सादरीकरण प्रा. डॉ. पाटील यांनी केले. त्यांच्या श्रवणीय गायकीतून अक्षरशः कर्मवीर चरित्र श्रोत्यांच्या समोर उभे राहिले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना, ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी रयतेच्या शिक्षणासाठी कर्मवीरांनी केलेला संघर्ष, मुष्ठीफंड योजना, कमवा व शिका हा स्वावलंबी मूलमंत्र अशा नानाविध गोष्टी या गायकीतून उपस्थितांसमोर ठेवण्यात आल्या.
श्रोतृवर्गानेही टाळ्यांचा गजर करत या गायकीला दाद दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे असलेले योगदान व त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष , लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा अतुलनीय त्याग या सर्व करुणामय गोष्टींमधून रसिकांचे हृदय पाझरले.
या सुरेल मैफिलीला तबल्याची व विविध पारंपरिक वाद्यांची साथ सातारा येथील प्रसिद्ध तबलावादक मल्हारी गजभारे यांनी दिली. कर्मवीर चरित्रातील निवडक प्रसंगांचे गोष्टीरूप निवेदन प्रा. प्रज्ञा पाटील यांनी केले. प्रा. डॉ. पाटील यांच्या सुरांना प्रियांका लोंढे यांनी साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांनी केले.