Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » कर्मवीरांचा विचार निर्भयपणे पुढे नेणारा बापमाणूस हरपला

कर्मवीरांचा विचार निर्भयपणे पुढे नेणारा बापमाणूस हरपला

कर्मवीरांचा विचार निर्भयपणे पुढे नेणारा बापमाणूस हरपला

प्राचार्य आर.डी.गायकवाड यांना साश्रुपूर्ण कृतज्ञतेसह श्रद्धांजली

कर्मवीर, डॉ.एन.डी.पाटील, प्राचार्य आर.डी.गायकवाड ,यांच्या कार्यप्रेरणा घेण्याचे आवाहन 

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी ते प्राध्यापक,प्राचार्य, सचिव,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,रयत सेवक संघाचे संस्थापक ,शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे प्रमुख,रयत सेवकांच्या न्यायासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी जीवनभर कार्य करणारे प्राचार्य आर.डी.गायकवाड यांचे ८ मार्च २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आयुष्यभर सतत कार्यशील राहून त्यांनी अनेक विद्यार्थी, रयत सेवक यांना न्याय मिळवून दिला.रयत शिक्षण संस्थेच्यासाठी नवनवीन योजना आणून संस्था गतिमान केली.कर्मवीरांच्या प्रमाणेच अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य त्यांच्यात होते.संस्थेतील प्रत्येक शाखेला भेट देणारे प्राचार्य म्हणून आर.डी.गायकवाड यांना ओळखले जाई. त्यांच्या जाण्याने एक धगधगते आर.डी.पर्व सर्वांच्या मनात जागे झाले. या निमित्ताने छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे १५ मार्च २०२५ रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. रयत सेवकांच्या विद्यार्थ्यात रयत प्रेम रुजवणारा,कर्मवीरांचा व रयत शिक्षण संस्थेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता गेल्याचे दुःख सर्वाना होतेच पण त्यांचा झुंजारपणे केलेला प्रवास, प्रेम,आपुलकी,मैत्री,मदत,जिव्हाळा ,साधेपणा ,कष्टाळूपणा ,विनोदबुद्धी,मनमोकळा स्वभाव,संघर्ष इत्यादी अनेक गोष्टी शोकसभेत मनोगतातून व्यक्त झाल्या.कर्मवीरांचा व रयत शिक्षण संस्थेचा विचार निर्भयपणे पुढे घेऊन जाणारा एक बापमाणूस हरपल्याची खंत या सभेत व्यक्त झाली. या शोकसभेत, प्राचार्य आर.डी.गायकवाड यांचे कुटुंबीय,पत्नी प्रा.डॉ.हेमलता गायकवाड, मुलगा सारंग गायकवाड, मुलगी शिल्पा जरे,प्राचार्य आर.के.शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,मा.मुनताजअली शेख,मा.बाबासाहेब बाड, प्राचार्य डॉ.अशोक भोईटे, प्राचार्य डॉ.जे.जी.जाधव,कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,ऑडीट विभागाचे सह्सचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे,माध्यमिकचे सचिव श्री.बी.एन.पवार,प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले,प्राचार्य शहाजीराव डोंगरे,प्रा.डी.ए.माने,प्रा.डॉ. भास्करराव कदम, इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

  शोकसभेत प्रारंभी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी प्राचार्य आर.डी.गायकवाड यांचा जीवनपट सांगितला आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. पोपट काटकर यांनी काम करणाऱ्या सेवकांच्या अडचणी त्यांनी सोडविल्याचे सांगून कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्याप्रति त्यांना जिव्हाळा होता असे सांगितले. डॉ.भास्करराव कदम यांनी आम्ही विद्यार्थी असलेल्या काळात डॉ.एन.डी.पाटील,प्राचार्य आर.डी.गायकवाड हे विद्यार्थी चळवळीचे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आम्ही रात्री व्याख्यानांचे आयोजन करत असू, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले असे ते म्हणाले.प्रा. डी.ए.माने यांनी प्राचार्य आर.डी.गायकवाड यांचे काम म्हणजे झंझावात असल्याचे सांगितले. अनेक पदावर त्यांनी कामे केली ,इतिहास विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडल मिळवल्याचे सांगितले. गनी आतार ,प्राचार्य एस.के उनउने बापू, इस्माईल साहेब मुल्ला, इत्यादी कर्मवीरांच्या निष्ठावंत अनुयायी यांनी तयार केलेली रयतची संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. कमवा आणि शिका योजना इतकी वर्षे असूनही या मुलांसाठी अद्यापही स्वतंत्र वसतिगृह बांधले गेले नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य आर.डी.गायकवाड यांचे जावई डॉ.इंद्रजीत निकम यांनी ‘माझ्याशी ते मित्रासारखे मोकळेपणाने बोलत असत’ असे सांगून त्यांचे जीवन म्हणजे परिसस्पर्श होता. दुसऱ्यांचा विचार करणारे ते व्यक्तिमत्व होते असे ते म्हणाले. अंबादास पवार यांनी कमवा आणि शिका योजनेतले पूर्व अनुभव सांगून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मदत करण्याची नाळ त्यांनी अखेरपर्यंत तोडली नाही असे मन व्यक्त केले.आटपाडी येथील प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले म्हणाले ‘ त्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवले. रयत शिक्षण संस्थेबद्दल प्रेम, प्रामाणिकता कष्टाळू जीवन ही त्यांची वैशिष्ट्ये असून त्यांनी अनेकांना नोकरी मिळवून दिली.तसेच अनेकांचे विवाह जमवले तसेच विविध संघटना बांधण्याचे काम केल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी काया,वाचा मनाने त्यांनी रयतचे कार्य केल्याचे सांगितले. प्राचार्य गायकवाड यांची कन्या शिल्पा जरे यांनी आई-वडील यांच्या संस्कारामुळे पुस्तक वाचण्याचा छंद लागला असे सांगून त्यांचे झाडावर, पशुपक्षी यांच्यावर प्रेम होते, हरणे ,काळवीट,ससे ,कबुतरे ,त्यांनी पाळली होती. असे सांगितले. वडील लेबरस्कीमचे विद्यार्थी होते,ते नुसते माणूस नव्हते तर बाप माणूस होते,आयुष्यभर त्यांनी काम करण्यासाठी दम घेतला नाही असेही त्या म्हणाल्या. प्रा.नारायण काळेल यांनी सक्षम प्रशासक, माणुसकी असलेला माणूस ,एक दुर्दम्य आशावादी व्यक्तिमत्व ते असल्याचे सांगितले. पी.बी. वाघमारे यांनी धीर देणारे व्यक्तिमत्व असून आमचे कौटुंबिक सबंध होते, त्यांनी आयुष्यात जात पाहिली नाही,प्रेम,जिव्हाळा ,अंत: करणाची निर्मलता ही त्यांच्याकडे होती असे ते म्हणाले. जयराम पाटील यांनी त्यांनी संस्थानिष्ठ सेवकांची संघटना तयार करून रयत सेवक बँक उभारण्यात मोठे योगदान दिले असल्याच्या आठवणी सांगितल्या. ए.वाय.जाधव म्हणाले की त्यांनी कर्मवीर अण्णा यांच्या प्रमाणेच अनेक कुटुंबे उभी केली. श्री.खरात यांनी कोरोना काळात त्यांनी घेतलेले ३६ मेळावे, संस्थेत पाठपुरावा करण्याची त्यांची तडफ ,सततचा जनसंपर्क, झाडांच्याबद्दलचे प्रेम या गोष्टी सांगितल्या

 

      . प्राचार्य आर.के शिंदे यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये विद्यार्थी असल्यापासून आम्ही चांगले मित्र होतो असे सांगत ,त्यांनी शाखा विकास,संस्था विकास, राजर्षी शाहू कॉलेज उभारणीतील योगदान, कोल्हापुरात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा उभा करणे, रयत शिक्षण संस्थेत इंजिनियरिंग कॉलेज,रयत प्रिंटींग प्रेस सुरु केल्याची माहिती दिली. मकरंद छापछिडी यांनी साहेब, देवमाणूस असल्याचे सांगितले. अमेरिका,इंग्लडचा इतिहास याचा अभ्यास असल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे ते देत असत अशी माहिती दिली. बबलू परदेशी म्हणाले की ते आम्हाला कधी रागवले नाहीत. ते कष्टात रमणारे होते. ऊस,गुळ त्यांनी केला होता. गायीपासून दुधाची अपेक्षा न करता त्यांनी शेणाची अपेक्षा केली.ते स्वतः शेण काढत. त्यांना कधी गर्व नव्हता. आजही शिकून देखील सामान्य माणसाला कसे आपुलकीने बोलावे हे कळत नाही. साहेबांनी सर्वांची काळजी घेऊन अनेक कुटुंबे फुलवली. रयत सेवक मित्रमंडळाचे शरद यादव यांनी रयत शिक्षण संस्था ही शिक्षकांनी चालवली पाहिजे अशी कर्मवीरांची अपेक्षा होती हे सांगून आज संस्था शिक्षकाच्या ताब्यातून बाहेर चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितली. काष्टी येथील ३ शिक्षक कमी केले ,हा अन्याय आहे हे त्यांनी संस्थेला समजून दिले होते. आज रयत शिक्षण संस्थेत घटना दुरुस्ती करण्यात आली. शिक्षकांनी संस्था चालवली पाहिजे हा त्यांचा विचार ही दूरदृष्टी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.राजगे यांनी लेबरस्कीम विद्यार्थी ते पीएच.डी प्रवास सांगत प्राचार्य आर.डी.गायकवाड यांनीच आपल्याला घडवल्याचे सांगितले.गुलाबराव खाडे यांनी त्यांनी कधीही जातीचा विचार केला नाही,तसेच कर्तव्याला फाटा देणाऱ्या सेवकाला महत्व दिले नाही. त्यांना लोक हवे वाटत. मैत्रीचे नाते त्यांचे सर्वांशी असे. प्रताप शिंदे यांनी माझी पत्नी वारली तेंव्हा साहेब घरी आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.धनंजय कचवे यांनी प्राचार्य आर.डी.गायकवाड साहेब यांचेविषयी पुस्तके लिहावीत असे सांगितले. डॉ.अशोक भोईटे यांनी मी नोकरीत माझे पहिले प्राचार्य ते होते. शिक्षक संपाच्या काळात त्यांनी शिक्षकांना साथ दिली. असे रयत सेवक आता दुरापास्त झाले आहेत असे ते म्हणाले. इंजिनियरिंग कॉलेजचे देवी सर यांनी पवार साहेबांच्या कडे कार्यकर्त्यांचे मोहोळ असते, ते सोडले तर प्राचार्य आर.डी.गायकवाड यांनी कार्यकर्त्याचे मोहोळ सांभाळले असे ते म्हणाले.

 

              प्राचार्य डॉ.जे.जी जाधव म्हणाले की कर्मवीर,डॉ.एन.डी पाटील,प्राचार्य आर.डी.गायकवाड यांचेकडून आपण कामाची प्रेरणा घ्यावी. कर्मवीरांची कामे त्यांनी केली. अण्णांनी तयार केलेली कमवा आणि शिका योजना हिच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत श्रद्धा होती. सेवकाविषयी नितांत प्रेम होते.ते नेहमी अन्यायाविरुद्ध होते. कर्मवीरांचा विचार म्हणजे शिक्षकाचे संस्थेत प्रतिनिधित्व. संस्था टिकवायची असेल तर शिक्षकच हवेत हाच कर्मवीर यांचा विचार होता. आणि हेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. लवू नका,पण संस्थेच्या कामाला कुणी विरोध करू नका हीच त्यांची तगमग होती. रयत सेवक हा कर्मवीरांचा कार्यकर्ता पाहिजे असे त्यांना वाटत असे. आणि त्यांनी आयुष्यभर तेच काम केले. महादेव बाड म्हणाले की’ गायकवाड साहेब मला शिक्षणासाठी घेऊन आले.त्यांचा धाक,शिस्त महत्वाची होती.आज शाहू कॉलेजला २५ ते २६ छत्रपती अवार्ड मिळालेले दिसतात. आम्ही माणसात गणले जात नव्हतो तेव्हा शिक्षणाची ताकद काय असते ते आम्हाला त्यांनी सांगितले. प्राचार्य शहाजी डोंगरे यांनी गायकवाडसाहेबांचे वडील धाडशी असल्याचे सांगून त्या काळात त्यांचे घरी बंदूक असल्याचे सांगितले. मी शेतमजूराचा मुलगा पण माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी मला जावई करून घेतले. आपल्या स्वतःच्या मुलीबरोबर भावांच्या मुलीना देखील सुख समाधान मिळावे यासाठी त्यांनी चांगले जावई शोधले. निस्पृह वृत्तीचे साहेब माझ्याजवळ मन व्यक्त करीत असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी गावात नालाबंडीगच्या कामात वडील काम करत असताना मी त्यांना मदत करीत होतो. १० वी पास झाल्यावर मला त्यांनीच उत्तम दीक्षित बरोबर कोल्हापूरला शिक्षणासाठी पाठवले. त्यातूनच पुढे मला नोकरी दिली. माझा विवाह घडवून आणला. माझ्या प्रगतीत त्यांचे योगदान आहे.त्यांनी सांगितलेले ओंजळीतले दिवस हे आत्मचरित्र मी शब्दांकित केले. मूळ संहिता खूप परखड होती. त्यामुळे पुढे ती सौम्य असावी यासाठी डॉ.द.ता .भोसले यांनी ते पाहून संपादित करून दिल्याचे सांगितले. मा.मुनताजअली शेख म्हणाले की मी उस्मानाबादच्या परिसरातून आलेला एक मुलगा. शिक्षणासाठी कोल्हापूरला आलो. त्या काळात कमवा आणि शिकामध्ये ,दगड वाहून नेणे ,बागकाम ,पाणी भरायचे काम, स्वच्छतागृह सफाई अशी अनेक कामे केली. काम करायला कधी लाजायचे नाही हा संस्कार त्यांनी दिला. त्या काळात कमवा आणि शिका योजना चालवणे अवघड होते. ३०-४० विद्यार्थ्यापासून ८८ पर्यंत विद्यार्थी संख्या झाली होती. या काळात रोटरी क्लब ने या योजनेतील मुलांना काम दिले. रोटरीने ही मुले दत्तक घेतली. पुढच्या काळात जवळपास ४५० विद्यार्थी इथून तयार झाले. रोटरीच्या सहाय्याने शिकणारा मी पुढे रोटरीक्लबचा अध्यक्ष झालो. तेंव्हा माझा सत्कार गायकवाड साहेबांनी केला होता. कोल्हापूरला त्यांनी व्यंकप्पा भोसले सारखे अनेक कार्यकर्ते तयार केले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रा.डॉ.रामराजे देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.संदीप किर्दत व डॉ.अभिमान निमसे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेतील सर्व परिसरातील रयत सेवक यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

Post Views: 40 तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक

Live Cricket