सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा
सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेऊन या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
शहापूर, धोंडेवाडी, बाबरमाची येथील नागरी सुविधेंतर्गत 27 कामांच्या आढावा घेण्यात आला. पुनर्वसन अधिनियम 1999 तसेच महसूल व वन विभागाडील शासन निर्णयाप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे नागरी सुविधा देण्यात याव्यात. यावेळी त्यांनी पिण्याचे पाणी, शाळा, खेळाचे मैदान, ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिरे, रस्ते, शेत जमिनीतून जाणारी पायवाट, वीज पुरवठा, गटारे, शौचालय, बस स्टॅन्ड, गोठे, दवाखाने, उद्याने, पोस्ट ऑफीस आदी सुविधांचा आढावा घेतला.
बाबरमाची येथील जी कामे प्रस्तावित आहेत त्यांना एक महिन्यात तांत्रिक मंजुरी घेऊन कामांना सुरुवात करावी. तसेच विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणचे काम खर्चाच्या अंदाजपत्रकानुसारच करावे आणि येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
वेळे ता. जावली येथील खातेदारांची शेत जमिनीचा सात बारा व नकाशा त्यांना जागेवर जावून वाटप करावयाचा आहे हे कामही येत्या एक महिन्यात पूर्ण करावे. तसेच येथील नागरी सुविधांच्या कामाची आचार संहिता संपल्यानंतर निवीदा प्रक्रिया राबवावी.
देऊर ता. जावली येथील भूखंड मोजणी, वाटप, शेती भूखंड याबाबत कार्यवाही प्रलंबित आहे हेही काम एक महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.
या बैठकीमध्ये मौजे बोपेगाव, मळे व बहुले येथील पुनर्वसनाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. तसेच पाथारपुंज येथील पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. पाथारपुंजचा बंदी दिनांकाचा महत्वाचा विषय मार्गी लागला असून पुनर्वसनाला गती देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.



