
कल्याण : माघी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून कल्याणात ७० फुटी अतिभव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात हा उपक्रम आयोजित हा करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा माघी गणेशोत्सवाचे 30 वे वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या माघी गणेशोत्सवामध्ये आपण प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची इच्छा अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यानूसार कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात या भव्य मंदिर प्रतीकृतीचे काम सुरू असल्याची माहिती आयोजक आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या वेळेनुसार याठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.





