व्यासपीठावर भांडणाऱ्यांचा जनतेने कोणता आदर्श घ्यायचा ? आ. जयकुमार गोरे ; ठरलयवाल्यांच्या विरोधी उमेदवाराबद्दल तर न बोललेच बरे
सातारा : प्रतिनिधी माझ्या विरोधात लढण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. भांडणे, कळवंडे होवून अखेर कसेबसे घार्गेंचे नाव आमचं ठरलय टीमने निश्चित केले, मात्र आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली तरी त्यांची थेट व्यासपीठावर भांडणे सुरु आहेत. त्यांच्यातच एकी नसल्याचे दिसत असल्याने जनतेसमोर ते काय आदर्श ठेवणार आहेत. माझ्या विरोधी उमेदवारांच्या आदर्शाबद्दल तर न बोललेच बरे असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
खटाव तालुक्यातील भुरकवडी, सातेवाडी, पेडगाव परिसरातील गावभेटीदरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांच्या कालखंडात मी गावोगावी रस्ते, सभामंडप,पूल,बंधारे, डीपी बसवणे अशी कोट्यवधींची कामे केली आहेत. माझ्या कार्यकर्त्याने फोनवरून जरी काम सांगितले तरी ते मी मार्गी लावले आहे. मतदारसंघातील पाणीप्रश्न मोठ्या प्रयत्नाने अंतिम टप्य्यात आणला आहे. जातीपातीचे राजकारण न करता माण आणि खटाव एकाच आईची लेकरे मानून मी विकासकामे करत आलो आहे. दुजाभाव न करता दोन्ही तालुक्यांची गरज पाहून विविध योजनांच्या पाण्याचे वितरण करत आलो आहे. आपण आणलेल्या पाण्यावरच दोन्ही तालुक्यात ऊसाची बागायती शेती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळेच मतदारसंघात साखरेचे कारखाने सुरु आहेत. पाणीच आणले नसते तर कारखाने काय कुसळावर चालवले असते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आ. गोरे पुढे म्हणाले, आमच्या महायुती सरकारच्या कार्यकाळापासून शेतीचे पाणी, वीज, रेशनिंगचे धान्य मोफत मिळत आहे. शेतकरी, माता भगिनींच्या खात्यावर दर महिन्याला पैसे येत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता १५०० वरुन २१०० करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना आणखी एकदा कर्जमाफी मिळणार आहे. आम्ही लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर लाभाची रक्कम पाठवत असल्याने भ्रष्टाचार संपला आहे. एकीकडे आम्ही समाजातील सर्व घटकांसाठी योजना राबवत आहोत तर दुसरीकडे विरोधक या योजना बंद करण्याची भाषा करत आहेत. मी गावोगावी कोट्यवधींची विकासकामे करताना कधी पक्ष, गट तटाचा विचार केला नाही. विरोधकांनी कोणत्याच गावात काहीच केले नसल्याने मते मागायला आल्यावर जनतेने त्यांना आमच्या गावात तुमचे एक विकासकाम कोणते ते दाखवा असा प्रश्न विचारावा असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान खटाव तालुक्यात सलग चौथ्या दिवशी गावोगावी भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली होती.
ऊसाचा काटा मारणाऱ्यांच्या विरोधात आंदोलने आणि नंतर पाठिंबा ?
खटाव तालुक्यातील एका शेतकरी संघटनेने साखरकारखान्यावर ऊसाची काटेमारी सुरु असून शेतकऱ्यांची लूट होत असल्यामुळे आंदोलन केले होते. त्याच संघटनेने विधानसभा निवडणूकीचा अर्जही भरला होता. निवडणूकीतून अचानक माघार घेऊन ऊसाच्या वजनात काटमारी करणाऱ्यांना या संघटनेने पाठिंबा दिल्याने शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेतकऱ्यांविषयीचा त्या संघटनेचा कळवळा बेगडी होता हे आता सिध्द झाले असल्याचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.