उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत साताऱ्यात आयटी पार्कसाठी 42 हेक्टर जागा देण्याचा निर्णय
सातारा प्रतिनिधी – राज्य सरकारने आयटी पार्क उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील ४२ हेक्टर जागा आयटी पार्कसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. या निर्णयामुळे साताऱ्याच्या विकासाची गती वाढणार असून होणार असून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन तरुणाईच्या हातात काम निर्माण होणार आहे.
आयटी पार्कसाठी ४२ हेक्टर सरकारी जमीन देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने त्वरित प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन केले जात आहे. याशिवाय, मुंबई ते कोल्हापूर महामार्गावर असलेला सातारा जिल्हा उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे देशभरातून आयटी कंपन्यांसाठी हा एक आकर्षक डेस्टिनेशन ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत साताऱ्यातील युवकांनी आयटी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये शिकली आहेत, पण त्यांना पुणे, बंगळूर, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊन रोजगार मिळवावा लागतो आहे. आता आयटी पार्कच्या माध्यमातून या युवकांना साताऱ्याच्याच भूमीवर संधी मिळणार आहे.
