मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
महाबळेश्वर:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे आयोजित महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या १५व्या वार्षिक संमेलनात बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी “मी डॉक्टर नसलो तरी छोटे-मोठे ऑपरेशन करतो आणि महाराष्ट्राला अपेक्षित असणारे ऑपरेशन मी केले आहे,” असे सूचक विधान केले.
डॉक्टरांच्या परिषदेत राजकीय ‘ऑपरेशन’ची चर्चा
महाबळेश्वर येथे असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ सातारा यांच्या वतीने या १५व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्यभरातील हजारो डॉक्टरांनी भाग घेतला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील ‘जीवनगौरव पुरस्कार’ (लाइफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड) प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवात सातारकरांचे कौतुक करून केली. ते म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील लोक कंदीपेढ्यासारखे गोड आहेत आणि त्यांच्या मनात प्रेमाची स्ट्रॉबेरी आहे. माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळे एका डॉक्टरचा पिता म्हणून मला या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली.”
महाराष्ट्राच्या ‘अपेक्षित ऑपरेशन’चा उल्लेख यावेळी बोलताना शिंदे यांनी सूचक विधान करत सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले,“मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. महाराष्ट्राला जे अपेक्षित होते, ते ऑपरेशन मी केले आहे.” उपमुख्यमंत्र्यांचा हा उल्लेख, राज्याच्या सत्तांतरानंतर झालेल्या राजकीय बदलांकडे होता, हे स्पष्ट जाणवत होते.
महाबळेश्वरच्या मातीचा आणि विरोधकांच्या ‘स्ट्रेस’चा संदर्भ:
महाबळेश्वरचे निसर्गरम्य वातावरण आणि त्याचे महत्त्व सांगताना त्यांनी ‘स्ट्रेस’ (तणाव) या विषयालाही राजकीय वळण दिले.ते म्हणाले, “तणाव कमी करण्यासाठी लोक साताऱ्यातील महाबळेश्वरला येतात. येथील मातीतच तणाव कमी करण्याचा गुणधर्म आहे. मलाही जेव्हा ताण येतो, तेव्हा मी गावाकडे येतो. आणि जेव्हा मी इथे येतो, तेव्हा मात्र विरोधकांचा ‘स्ट्रेस’ (तणाव) वाढतो.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या हजरजबाबी आणि सूचक वक्तव्यांनी वैद्यकीय परिषदेच्या मंचावरून राजकीय संदेश दिला गेला आणि कार्यक्रमस्थळी हास्यकल्लोळ झाला.




