मनानं श्रीमंत असणारी माणसचं समाज घडवू शकतात . इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांचा विश्वास , शिवाजीनगर रत्न पुरस्काराचे वितरण
खंडाळा : अलिकडच्या काळात माणसाच्या मनातील कृतज्ञता व संवेदनशीलता हरवली जात आहे. माणसाने माणसाचा आधार बनण्याची भावना संपुष्टात येवू लागली आहे. त्यासाठी मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. केवळ संपत्तीचा मोह धरून जीवन जगणे योग्य नाही तर समाजाप्रती दातृत्वाची भावना जोपासणे गरजेचे आहे. मनानं श्रीमंत असणारी माणसचं समाज घडवू शकतात असा विश्वास इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केला.
शिवाजीनगर ता. खंडाळा येथील स्व. समिता भोसले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘ शिवाजीनगर रत्न पुरस्कार ‘ समारंभानिमित्त ‘ इतिहास व समाजजीवन ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा बांदल , वसंतराव बांदल , उद्योजक धनाजी भोसले, सरपंच हर्षवर्धन भोसले , उपसरपंच राधिका सपकाळ , औद्योगिक सेल अध्यक्ष राजेंद्र भोसले , ग्रा पं . सदस्य सुजीत डेरे, सोसायटीच्या चेअरमन कोमल डेरे , नानासाहेब हाके यांसह प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी राज्य कर निरिक्षक काजल सपकाळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
मुलांना घडविणे ही आई वडिलांची मोठी जबाबदारी आहे. माता प्रेम देते माया देते संस्कार देते आणि पित्याच्या धाकामुळे शिस्त लागते त्यामुळेच मुलांच्या आयुष्याला आकार मिळतो. मात्र मुलांनीही वृद्धापकाळात आईवडिलांची सेवा करणे गरजेचे आहे. मातापित्यांची सेवा हाच खरा मानवता धर्म आहे. ज्या घरात वृद्ध आहेत तिथे संस्कार प्रवाहित होतात, त्यामुळे त्या घराचा कोणीही कधीही पराभव करू शकत नाही. ज्या घरात आईवडील नाहीत त्यांना त्यांची खरी किंमत कळते. जीवनात अनेक संकट येतात मात्र त्यांना न घाबरता त्याचा सामना केला पाहिजे कारण संकटं आपणाला अडवायला येत नाहीत तर ती घडवायला येतात. संकटातून मार्ग काढला की यशाची दारे खुली होतात. जीवनाच्या प्रवासात चांगल्या विचारांची कास धरा. त्याच उदात्त हेतूने मार्गक्रमण करा. शेवटी पेरलं तेच उगवलं जातं हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे विधायक विचारातून सामाजिक विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
स्वागत राजेंद्र भोसले यांनी केले तर हर्षवर्धन भोसले यांनी आभार मानले.
