हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सातारा -हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथील गुरुकुलचे समन्वयक मा. श्री. शुभम गायकवाड सर हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परेड द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
आपल्या प्रास्ताविकात स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. मंजुषा बारटक्के यांनी 76 व्या प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा देऊन स्कूलच्या सर्व विभागांबद्दल माहिती दिली. यावर्षी गुणवंत विद्यार्थी म्हणून ध्वजारोहण करण्याचा मान स्कूलचा सर्व गुणसंपन्न विद्यार्थी चि. अवधूत सावंत याने मिळवला. आपल्या भाषणात त्याने स्कूल मधील शिक्षकांनी केलेल्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल तसेच मा.अमित सरांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मा. शुभम गायकवाड सरांनी आपल्या भाषणात हिंदवी परिवाराचे कौतुक करत नुकत्याच पार पडलेल्या युवा दिनाच्या निमित्ताने हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने घातलेल्या 1000 सूर्यनमस्कारांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या योद्धा बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाची गाथा सांगत त्यांचे चरित्र विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले तसेच अहिल्याबाई होळकर आणि लक्ष्मीबाईंच्या शौर्याचे ही वर्णन करत अडचणींवर मात करून, आपली ताकद आणि सदसदविवेक बुद्धी वापरून कामे केली पाहिजेत असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. अमित कुलकर्णी सर यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करून प्रत्येक भारतीयाच्या शरीरात प्राण निर्माण करण्याचे कार्य केले असे गौरवोद्गार काढले. डॉ. आंबेडकरांच्या सातारा येथील प्रतापसिंह शाळेतील त्यांच्या शिक्षणाचा प्रवास ही त्यांनी आपल्या भाषणात सांगितला. आपल्या कृतीतून आपण भारत देश घडवण्यात योगदान देऊ शकू तसेच आपल्या कृतीचा आपल्या पालकांना, समाजाला, देशाला अभिमान वाटला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 मे चे महत्व लक्षात घेऊन देशाला आपले योगदान दिले पाहिजे असे सांगत स्कूलच्या हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
रंगारंग कार्यक्रमांमध्ये हिंदवी व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी समूहगीते सादर केली . इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड व देशभक्तीपर गीत आपल्या नृत्याविष्कारातून सादर केले.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री नानासाहेब कुलकर्णी सर, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका सौ. रमणी कुलकर्णी मॅडम, स्कूलच्या व्हाईस प्रिन्सिपल सौ. शिल्पा पाटील मॅडम, गुरुकुल प्रमुख श्री. संदीप सर, ज्ञानप्रबोधिनी, निगडी गुरुकुलचा चि.आर्चीस हे उपस्थित होते.याप्रसंगी युवा दिनाच्या निमित्ताने गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सूर्यनमस्कारांबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
स्कूलमध्ये एकूणच सर्व वातावरण देशभक्तीमय झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. कनका अभ्यंकर तर आभार प्रदर्शन इयत्ता नववीतील चि. श्रेयस मोरे याने केले.
