हिंदवी गुरुकुलमध्ये वर्षारंभ उपासना
सातारा- हिंदवी पब्लिक स्कूल अंतर्गत कार्यरत हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुल, सातारा येथे गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने वर्षारंभ उपासना कार्यक्रम उत्साहात झाला.
कार्यक्रमास ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथील गुरुकुल प्रमुख आदित्य शिंदे, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, प्रसाद जोशी, गुरुकुल प्रमुख संदीप जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवन व ईशावास्य उपनिषदातील श्लोक पठणाने झाली. गुरुवंदना व गुरू-शिष्य परंपरेवर आधारित श्लोक, नंतर वैयक्तिक ध्येयांची प्रार्थना आणि नियमांचे पालन यावरील श्लोक व अभंग सादर करण्यात आले. उपासनेचा समारोप शिवमंत्रोच्चाराने झाला. ही सर्व उपासना हिंदवी यांनी विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली. या उपासनेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, अध्यापक आणि संपूर्ण गुरुकुल परिवाराने नववर्षाच्या प्रारंभी आपापले वैयक्तिक, तसेच सामूहिक संकल्प सादर केले. हे संकल्प अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश या पंचकोशांवर आधारित होते. विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमतेचा विकास व विद्याभ्यासात उज्ज्वल यश मिळवण्याचे संकल्प केले. अध्यापकांनी कौशल्यवृद्धीचे संकल्प मांडले, पालकांनी डिजिटल उपवासाचे संकल्प घेतले, तर गुरुकुलाने नवीन शैक्षणिक व मूल्याधारित उपक्रम हाती घेण्याची ग्वाही दिली. मिथाली लोहार व श्रुती राजमाने यांचे संगीत होते. प्रणव पित्रे याने तबल्याची साथ दिली. कार्यक्रमाचे सर्व नियोजन गुरुकुलाचे अध्यापक हेमलता जगताप, शिल्पा बेंद्रे, राहुल रावन आदींनी केले. प्रसाद जोशी यांनी प्रस्तावना केली. विद्यार्थिनी केतकी भुजबळ हिने सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी गायत्री देशपांडे हिने आभार मानले.
