शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थ्यांची पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
सातारा :करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून पूरग्रस्तां प्रति असणारी संवेदनशीलता दाखवून दिली.
शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव तुषार पाटील यांच्या प्रेरणेतून विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले विद्यार्थ्यांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला व भरपूर प्रमाणात शैक्षणिक साहित्य जमा केले .हे जमा झालेले शैक्षणिक साहित्य सोलापूर जिल्ह्यातील वांगी, वडकबाळ, आणि हत्तुर या गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संस्था संचालक रवींद्र जाधव ,पर्यवेक्षक यशवंत गायकवाड व उपशिक्षक सुशांत साळुंखे यांनी पार पाडली.
वांगी येथील शाळेची पुरामुळे झालेली विदारक अवस्था तसेच हत्तुर येथील शाळेमध्ये तर पुरामुळे वाहून आलेला गाळ अजूनही दिसत आहे. मन खिन्न करणाऱ्या या परिस्थितीत या शैक्षणिक साहित्याच्या मदतीमुळे तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले. व या संकट काळात मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांनी शिक्षण प्रसारक संस्थेचे व संस्था सचिव तुषार पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.




