मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते कासरूड पुलाचे दिमाखात उद्घाटन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाबळेश्वर (ता. महाबळेश्वर) : कासरूड येथे कोयना नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण पुलाचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपूरे, संजय गायकवाड, सुभाष सोंडकर यांच्यासह सरपंच संतोष जंगम, चंदुआप्पा, बाबुराव सकपाळ, धोंडीराम जंगम, घनश्याम सकपाळ, चंद्रकांत मोरे, विजय कदम, अनिल वीर, दिनेश साळवी, मनोहर पाटील, भीमाजी मालूसरे, सौ.दीपाली मालुसरे, राजाराम जाधव, बबन खांडसकर, संजय खांडसकर, बापू खांडसकर, अक्षय खांडसकर, देवजी खांडसकर आणि पंचायत समितीचे अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. कासरूड तसेच परिसरातील शिरवली, बिरवाडी आणि हातलोट या गावातील ग्रामस्थ, महिला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सुमारे ४ कोटी ६ लक्ष रुपये खर्चून हा पूल साकारण्यात आला आहे. या पुलाच्या कामाला गतवर्षी ५ जानेवारी २०२४ रोजी सुरुवात झाली होती. मे.व्ही.एस. इन्फ्रास्ट्रक्चर, पुणे या ठेकेदार कंपनीने या पुलाचे बांधकाम केले आहे. सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग, सातारा या शासकीय यंत्रणेने या प्रकल्पाचे कार्यान्वयन केले.
उद्घाटन सोहळा सायंकाळी आयोजित करण्यात आला होता आणि तो रात्री उशिरापर्यंत चालला. तरीही, आलेल्या ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने मान्यवरांचे स्वागत केले.
दरम्यान, ग्रामस्थांनी पुलाच्या उत्कृष्ट कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र, पुलाच्या चारी बाजूंना असलेल्या भरावाचे काम सध्या कच्च्या स्वरूपात आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने, हा भराव पक्का करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. कच्चा भराव धोक्याचा ठरू शकतो, त्यामुळे या मागणीची तातडीने दखल घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
