गुळुंबच्या उपसरपंचपदी प्रताप श्रीपती यादव
वाई प्रतिनिधी- वाई तालुक्यातील प्रगतिशील गाव म्हणून गुळूंबची ओळख आहे.राजकीय दृष्ट्या सजग असणाऱ्या या गावात नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या चुरशीच्या लढतीमध्ये अनपेक्षितपणे प्रताप श्रीपती यादव यांची निवड झाली.
सत्ताधारी उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. त्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून सचिन दादा यादव यांनी तर विरोधी पक्षात असणाऱ्या प्रताप श्रीपती यादव यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सत्ताधारी पक्षाकडे सहा व विरोधी पक्षाकडे पाच ग्रामपंचायत सदस्य असल्याने सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार उपसरपंच होणार ही गोष्ट निश्चित होती.
यासाठी झालेल्या मतदानामध्ये सत्ताधारी पक्षाच्या सदस्याचे एक मत बाद झाल्याने पक्षीय बलाबल समान झाले त्यामुळे चिठ्ठी टाकून उपसरपंच निवडण्याचे ठरले त्यानुसार झालेल्या निवडीत प्रताप श्रीपती यादव यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि अनपेक्षित पणे त्यांची गुळुंब गावच्या उपसरपंच पदी निवड झाली. सत्ताधारी पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो.
आले उत्पादनासाठी राज्य पुरस्कार प्राप्त असणारे श्री यादव यांची प्रगतीशील शेतकरी म्हणून तालुक्यात ओळख आहे. तसेच ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयाचे इतिहास विषयाचे शिक्षक आहेत.
किसनवीर सहकारी साखर कारखानाचे माजी संचालक प्रताप ज्ञानेश्वर यादव यांचे समर्थक मानले जातात.
सृजनशील अभ्यासू व्यक्तिमत्व, सामाजिक प्रश्नांची जाण असल्याने सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन विरोधकांनाही आपलेसे करण्याच्या स्वभावामुळे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची भागात ओळख आहे.राजकीय सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित असणाऱ्या गावच्या उपसरपंच पदी निवड अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. याबद्दल सर्व पक्षीय पदाधिकारी, गावकरी , सामान्य नागरिक यांच्याकडून त्यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक होत आहे.
