मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात त्यामुळेच ती मोठी होतात रवींद्र येवले ; लक्ष्मणरावतात्यांचीं जयंती ‘किसन वीर’वर साजरी
दि. २५/२/२०२४ : शिवाजीमहाराजांनी मावळ्यांमध्ये गुण शोधुन आपल्या सैन्यांमध्ये सामील करून त्यांच्या कलागुणांना युद्धभुमीवर योग्य पद्धतीने न्याय दिला. त्याचपद्धतीने जिल्हयाचे माजी खासदार, किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांनीदेखील कार्यकर्त्यांमधील गुण शोधून त्यांना योग्य ठिकाणी काम करण्याची संधी देण्याचे काम केले. मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात त्यामुळेच ती मोठी होतात, असे गौरवोदगार ग्रामीण साहित्यिक व वक्ते प्राचार्य रवींद्र येवले यांनी व्यक्त केले.
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जिल्हयाचे माजी खासदार, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांची ८६ व्या जयंतीनिमित्त रवींद्र येवले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील होते. यावेळी खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, उदय कबुले, यांची प्रमुख उपस्थिती होती.
रवींद्र येवले पुढे म्हणाल की, कोणत्याही कामाची सुरूवात करायची असते ती स्वतःपासून करायची असते त्याचप्रमाणे स्व. लक्ष्मणरावतात्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात गावच्या सरपंच पदापासून सुरूवात केली. राजकीय जीवनाची सुरूवात सरपंच पदापासून ते जिल्ह्याच्या खासदारकीपर्यंत झाली. याकाळात त्यांनी विविध पदे भूषविली. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँकेचे चेअरमन, संचालक तसेच किसन वीर कारखान्याचे चेअरमन, खासदार पदापर्यंतची पदे भुषविली. रडणारी माणसं खुप असतात, पण त्यावर उत्तर शोधणारी माणसं हीच खरी असतात हेच उत्तर शोधण्याचं काम स्व. लक्ष्मणरावतात्यांनी केलं आहे. परिसाचा स्पर्श झाला की त्याची सोनं होतं. त्याचप्रमाणे स्व. लक्ष्मणराव तात्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना स्पर्श केला त्या त्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्यामुळेच त्यांची जयंती जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होत असल्याचे दिसत आहे. तात्यांची विचारसरणी व स्पष्टवक्तेपणा भावतो आणि हाच त्यांचा गुण मला चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांचाही लोकसंग्रह किती मोठा आहे हे समजतं. स्व. लक्ष्मणरावतात्यांनी प्रत्येक गावातून योग्य माणसं निवडली व त्यांना घडविण्याचे काम केलेले आहे. त्यांचेच विचार आमदार मकरंदआबा पाटील घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत असल्याचे श्री. येवले यांनी सांगितले.
चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील म्हणाले की, संपुर्ण जिल्हयामध्ये स्व. तात्यांची जयंती वेगवेगळ्या वातावरणात पार पाडीत असल्यामुळे असे वाटत नाही की, तात्या आपल्यामध्ये नाहीत. त्यांचे आशिर्वाद आपल्या सर्वांवर कायमच राहणार आहेत. तात्यांनी ज्या ज्या ठिकाणी सत्तेवर होते त्या त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. शालेय जीवनात त्यांची मैत्री सुरेश वीर यांच्यासमवेत झाल्यानंतर किसन वीर आबांच्या घरी जाण्यामुळे त्यांना त्यांची विचारसरणी पटत गेली. तात्यांनी राजकीय जीवनाची सुरूवात सरपंच पदापासून केली त्यांना जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर काम करण्याची संधी मिळाली. सर्व स्तरावर काम करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेऊनच काम केले. सातारा जिल्हा बँकेमध्ये काम करतानादेखील मोठमोठे धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिला. कारखान्यावर काम करीत असतानादेखील शेतकऱ्यांचे हितच डोळ्यासमोर ठेवले होते. काही कारणास्तव कारखाना ताब्यातून गेला आणि त्याचे प्रायचित्त शेतकऱ्यांना आता भोगावे लागत आहे. किसन वीर व खंडाळा कारखाना आपल्या ताब्यात आला नसता तर शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली असती. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिलेल्या शब्दानुसार आपल्या कारखान्यास थकहमी मिळणार असून लवकरच कारखान्याला सुगीचे दिवस येणार आहेत. जुन्या पिढीतील लोकांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. या जयंतीमुळेच नवीन पिढीला जुन्या पिढीचे कार्य समजणार असल्याची भावनाही यावेळी श्री. पाटील यांनी व्यक्त केली.
प्रमोद शिंदे म्हणाले की, तात्यांच्या खुप आठवणी मनामध्ये आहेत. तात्यांचं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. धाडसी नेतृत्व अशी त्यांची खासियत होती त्यांच्याकडं पाहिलं आपल्या आयुष्यातील आधार शोधला जायचा. मला जर त्यांचा स्पर्श झाला नसता तर कदाचित मीही राजकारणात आलो नसतो. कार्यकर्त्यांवर कोणतेही संकट आले की त्यामध्ये खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे तात्या होते आणि त्यांची परंपरा आमदार मकरंदआबा व नितीनकाका पाटील पुढे चालवित आहेत. किसन वीर कारखाना वाचला तर सर्व सामान्य शेतकरी वाचेल ही त्यांची भावना होती. तसेच सर्वसामान्य शेतकरी व कामगारांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत कारखाना ताब्यात घेतला व दोन सिझन यशस्वीरित्या पार पडले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी देखील कारखान्यास मदत करण्याचे आश्वासन दिलेले असल्याने आमदार मकरंदआबा यांच्या नेतृत्वाखाली कारखाना नक्कीच या आर्थिक गर्तेतुन बाहेर पडणार असल्याचे सांगितले. यावेळी एस.वाय. पवार, लालासाहेब शिंदे, शिवाजीराव महाडीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशिला जाधव, मालोजीराव शिंदे, अनिल सावंत, शशिकांत पवार, अॅड. उदयसिंह पिसाळ, मोहनराव जाधव, रमेश गायकवाड, पोपट जगताप, संजय मोहोळकर, अॅड. श्रीकांत चव्हाण, भुषण गायकवाड, संपतराव शिंदे, अमृतराव शिंदे, बबनराव साबळे, मदन भोसले, मंगेशराव धुमाळ, संजयराव साळुंखे, राजेंद्र भोसले, बाळासोा भोईटे, अजय कदम, अॅड. पी. बी. भोसले, नानासोो भिलारे, राजेंद्र नेवसे, यशवंतराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण, संभाजीराव साळुंखे, संभाजीराव घाडगे, तात्यासाहेब धायुडे, मानसिंगराव साबळे, लक्ष्मणराव शेळके, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, नारायण नलवडे, सुजितसिंह जाधवराव, नितीन निकम, निवास शिंदे, अब्दुल इनामदार, अमृत गोळे, विजय शिंगटे, प्रतिक बाबर, सभासद शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.