ग्रामपंचायत गरोदर महिलांसाठी दुसरे माहेर
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पंचायत समिती वाई अंतर्गत एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला असून, 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण तालुक्यातील 925 गरोदर महिलांची ओटी भरून, ग्रामपंचायतने त्यांच्यासाठी जणू “दुसरे माहेर” बनण्याचा मनोदय व्यक्त केला.
कोणत्याही देशाचा खरा विकास अर्भक मृत्यू, बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या दरावरून मोजला जातो. हे प्रमाण कमी ठेवण्यासाठी गरोदर महिलांना योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी व आवश्यक सल्ला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन पंचायत समिती वाईने आरोग्य विभाग, ICDS आणि सर्व ग्रामपंचायतींनी एकत्र येत हा आगळा-वेगळा उपक्रम राबवला.
गटविकास अधिकारी विजय परीट, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव, विस्तार अधिकारी रूपेश मोरे, राहुल हजारे, शरद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ग्रामपंचायतीने महिला व बालकल्याणाच्या राखीव निधीतून पोषक आहाराच्या “ओटी” गरोदर महिलांना दिल्या.सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर, CHO, ANM, आशाताई व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलांची वैद्यकीय तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले.बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी पर्यवेक्षिका, ताई आणि मदतनीस यांनी आहाराची प्रात्यक्षिके, स्तनपानाचे महत्त्व सांगून महिलांचे प्रबोधन केले.
काही ग्रामपंचायतींमध्ये महिलांना झोपाळ्यावर बसवून, फुग्यांची सजावट, गाणी, नृत्य आणि रांगोळी यांद्वारे जणू माहेरी सणासारखा आनंद दिला गेला. यामुळे अनेक महिलांनी भारावून जाऊन “ग्रामपंचायत हे आमचे दुसरे माहेर आहे” अशी प्रतिक्रिया दिली.
या उपक्रमास मा. मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, तसेच महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नागेश ठोंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम केवळ गरोदर महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.
