गोव्यात २ रशियन महिला अन् एका आसामच्या महिलेची हत्या, हात-पाय बांधून अत्याचारानंतर हत्येचा संशय; मृतदेह नग्नावस्थेत
गोव्यात २ रशियन महिलांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. गोव्यातील गिरकरवाडा हरमल इथं भाड्यानं घेतलेल्या एका फ्लॅटमध्ये एलेना कस्थनोव्हा हिचा मृतदेह आढळून आला. यानंतर तिचा लिव्ह इन पार्टनर एलेक्सी लियोनोव्हला अटक केल्यानंतर त्यानं आणखी एका रशियन महिलेची हत्या केल्याचाही खुलासा केला. दुसऱ्या रशियन महिलेचं नाव एलेना वानीवा असं आहे. तिचा मृतदहे गोव्यातील मधलावाडा मोरजी इथं आढळून आला. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. एलेक्सी लियोनोव्ह हा सिरीयल किलर असल्याचा संशय असून त्यानं १० ते १५ महिलांची हत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एलेना वानीवाची हत्या १४ जानेवारीच्या रात्री झाली होती. तर एलेना कस्थनोव्हाच्या हत्येचा आणि वानीवाच्या हत्येचा पॅटर्न एकसारखाच होता. दोघींचेही हात बांधलेले होते आणि गळा चिरण्यात आला होता.. चौकशीत लियोनोव्हने आणखी हत्या केल्याचं कबूल केलं असून त्यात गोव्याबाहेरील घटनांचा समावेश आहे.
पोलिसांना लियोनोव्हने आणखी एका महिलेच्या हत्येबाबत सांगितलं आहे. आसाममधील ४० वर्षीय महिलेला अंमली पदार्थ देऊन मारल्याचा दावा त्यानं केलाय. पण आरोपी लियोनोव्ह सतत त्याचे जबाब बदलत असल्यानं आणि घटना, ठिकाण याबाबत प्रत्येक वेगवेगळी माहिती देत असल्यानं तपासाचं आव्हान निर्माण झालं आहे.
लियोनोव्हे अंमली पदार्थांच्या नशा करत असल्यानं त्याच्या दाव्यांची पडताळणी केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आतापर्यंत २ रशियन महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर आसामच्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता. यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून लियोनोव्हने तरुणींशी संबंध ठेवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. संशयिताने तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यांच्याशी संबंध ठेवले. त्यांच्यावर हात पाय बांधून अत्याचार केल्याचंही तपासात समोर आलंय. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लियोनोव्ह यानं गिरकरवाडा इथं एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एलिना कासथोनोनव्हा हिची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्यानं मधलावाडा मोरजी इथंही एलिना वनिवा हिची हत्या केली. एलिनाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. तिचाही गळा चिरण्यात आला होता. आसामच्या महिलेचा हरमल इथं खून केल्याचा तर कोरगाव इथंही एका तरुणीची हत्या केल्याचा दावा लियोनोव्हनं केलाय. त्याच्या या दाव्यांमुळे खळबळ उडाली असून गोवा हादरला आहे.




