तपासणी शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनील यादव, डॉ. रोहित यादव व डॉ.अश्विनी यादव
गिरिजा हॉस्पिटलच्या रोगनिदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा : गिरिजा हॉस्पिटलच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मोफत रोगनिदान तपासणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री साहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात मेंदू व मणक्यांचे आजार, अस्थिरोग तसेच त्वचारोग यांची तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. सुनील यादव, अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. रोहित यादव आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी यादव या नामवंत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन योग्य वैद्यकीय मार्गदर्शन दिले. मणक्याचे आजार, मेंदूत गाठ, फिटस्, गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडाचे इतर आजार तसेच केस गळती ब चेहऱ्यावरील पुरळ व विविध त्वचाविकार अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. तपासणीस आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या उपचार व शस्त्रक्रियोविषयी सल्ला देण्यात आला.
या शिबिरात १५० हून अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवला. रुग्णांनी सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत रुग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. पूढील काळातही अशाच स्वरुपाचे उपक्रम आयोजित केले जातील असे गिरिजा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सांगितले.
