जागतिक समुद्री महासत्ता बनण्याकडे भारताची झेप!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते (ऑनलाईन) तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2’चे उदघाटन संपन्न झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेएनपीए आणि पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी (पीएसए इंडिया) यांच्या सहकार्याचे कौतुक करून या भव्य टर्मिनलच्या निर्मितीसाठी अभिनंदन केले. हे टर्मिनल आता भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल म्हणून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणार आहे.
नवीन टर्मिनल भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र आहे. यासोबतच वाढवण बंदर सुरू झाल्यानंतर ते जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये स्थान मिळवेल. यामुळे भारतातील समुद्री क्षेत्रातील महाशक्ती म्हणून महाराष्ट्र उदयास येईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या ऐतिहासिक यशाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पोर्ट लेड डेव्हलपमेंट’ या धोरणात्मक दूरदृष्टीला जाते. गेल्या 10 वर्षांत या दूरदृष्टीमुळे बंदर क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन घडले असून, भारत जागतिक समुद्री अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करारांचे हस्तांतरण देखील झाले, ज्यामुळे भारत आणि सिंगापूरमधील भविष्यातील सहकार्य आणखी बळकट होणार आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पराग शाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
