प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे– पालकमंत्री शंभूराज देसाई*
सातारा : बलशाली भारताच्या निर्मितीसाठी गेल्या 10 वर्षात अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न करुन अमुलाग्र बदल घडवून आणण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाईल, अशी कामगिरी सर्वच क्षेत्रात सुरु आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची बाब आहे. देशत, महाराष्ट्र राज्य आणि सातारा जिल्हा यांची उज्वल परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वच जिल्हावासियांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजावंदनाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विविध सांस्कृतीक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार देाशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर जिल्हाधिकारी वैशाली कडूकर आदी उपस्थित होते.
छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा आणि इतर संस्थेच्या शाळांनी महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम भारदार सादरीकरण केले. या कार्यक्रमामध्ये 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सिंचनाच्याबाबतीत आपला जिल्हा अधिक पुढे आहे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचना क्षमता वाढविण्यात येत असून अधिक क्षेत्राला पाणी देणे सोपे होणार आहे. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र खूप मोठे आहे क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्यातील औद्योगीक क्षेत्र वाढवून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर आहे. शिक्षण व आरोग्यावर भर देण्यात आला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम उत्कृष्टरित्या राबविण्यात येत आहे. यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम सुरु केला आहे. खासगी हॉस्पीटलमध्ये ज्या पद्धतीने उपचार मिळतात त्याच पद्धतीने दर्जेदार ग्रामीण आरोग्य केंद्रातूनही आपण उपलब्ध करुन दिल्या आहेत.
देशाच्या आर्थिक व कृषी क्षेत्रात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. तसेच राज्याचा प्रगतीत सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, तरुण, नागरिक यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान
शिक्षण विभाग (माध्यमिक) व भारत स्काऊट गाई यांच्याकडील विविध पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अभियंता अभय काटकर, जयंत शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहत असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.ध्वजवंदन कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड यांनी उपस्थितांना कुष्ठरोग विषयक शपथ दिली.



