महिला सरपंच होणार डिजीटल साक्षर
दि.९ मार्च रोजी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा
सातारा-प्रतिनिधी ग्रामपंचायतीचे प्रशासकिय प्रमुख, कार्यकारी प्रमुख, आणि कोषाध्यक्ष हे सरपंच आहेत. आधुनिक काळात ग्रामपंचायतीचे व्यवहार आणि कामकाज ऑनलाईन झाले असून याबाबत संगणकीय ज्ञान प्रत्येक सरपंचांना आवश्यक आहे.
ई पंचायत ,वित्त आयोगाचे व्यवहार, पंचायत डेव्हलपमेंट इन्डेक्स, खरेदी प्रक्रिया याची माहिती आणि प्रत्यक्ष संगणकावर प्रशिक्षण देणारी दि.९ मार्च रोजी वर्ये येथे फक्त महिला सरपंचांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुध्दे आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी दिली आहे.
ग्रामविकास विभाग संचलित रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून १९६२ पासून पुणे , सांगली,सातारा जिल्ह्यातील सरपंच,सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजाची ओळख करून देणारे प्रशिक्षण घेतली जातात. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना संधी मिळाली असल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोठ्या प्रमाणावर महिला आहेत. आता संगणक युगात ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल झाले असून वर्ये येथील केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने उपस्थित महिला सरंपचांना स्वतंत्र संगणकावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ११:३० ते ४ यावेळी वर्ये ता. सातारा येथे होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते आणि सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुध्दे,सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या उपस्थित होणार आहे.
या प्रशिक्षणासाठी मर्यादित प्रवेश असून पुर्व नाव नोंदणी आवश्यक असून इच्छूकांनी सौ.माधवी जावळे (मोबा. ९७६२७४९४५८) यांना संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य विजय जाधव यांनी केले आहे.
