पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा परखंदी पॅटर्न यशस्वी’
वाई तालुक्यातील छोट्या गावाने दिला पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा मोठा संदेश
परखंदी, ता. वाई (प्रतिनिधी) – वाई तालुक्यातील परखंदी या गावाने पर्यावरणपूरक गणेशविसर्जन साजरे करुन राज्यात एक आदर्श प्रस्थापित केला आहे. याबद्दल या ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाई तालुक्यात परखंदी हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. आपल्या गावाची पर्यावरणीय ओळख कायम ठेवण्यासाठी संपूर्ण गावाने कंबर कसली. त्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समर्थ साथ मिळाली यातून गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प सोडण्यात आला. ग्रामपंचायतीचे यथायोग्य नियोजन आणि ग्रामस्थांची साथ यामुळे हा उत्सव पर्यावरणपूरक करणे शक्य झाल्याचे सरपंच सौ चित्रा जाधव आणि युवा नेते विराजभैय्या रतनसिंह शिंदे यांनी सांगितले.
विराज शिंदे म्हणाले की , ” ग्रामपंचायतींने नियोजन केल्यानंतर परखंदीच्या ग्रामस्थांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, या पद्धतीने नियोजन केले. ग्रामस्थांनी विसर्जनाच्या वेळी देखील पुरेशी काळजी घेत निर्माल्य थेट ग्रामपंचायतीकडे जमा केले.प्लॅस्टिकचा शून्य वापर कसा होईल यासाठी प्रयत्न केले. याशिवाय ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या ठिकाणीच मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. या उपक्रमामुळे गावातील तळी, विहिरी आणि इतर जलस्रोत प्रदूषित होण्यापासून वाचविले.” ग्रामस्थांनी या उपक्रमात स्वतःहून सहभाग घेऊन गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंदाचा केला याबद्दल विराज शिंदे यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, या उपक्रमात परखंदीच्या जागरुक नागरीकांसह, विराजभैय्या शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. सारिका हाके, सरपंच चित्रा जाधव, उपसरपंच जितेंद्र शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. दरम्यान हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा परखंदी पॅटर्न चर्चेचा विषय ठरला आहे.
