रोजगार केंद्रीत गुंतवणूक आणि सामाजिक बांधीलकीची जोपासना-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ह्युंदाई मोटर इंडिया लि.व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम व त्यांच्या शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली.वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव असून कंपनीने महाराष्ट्रातही महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पुण्यातील प्रकल्पामुळे वाहन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यावेळी ह्युंदाई कंपनीने राज्यातील वाहन उद्योगात आणखी गुंतवणूक करून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राज्यात ₹56 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी, पर्यावरण संवर्धन, रस्ता सुरक्षा आणि चालक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांसाठी उपयोगात आणला जाणार असून, त्यामुळे जनजीवन अधिक सुसह्य होईल. राज्य सरकार उद्योगस्नेही वातावरण तयार करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.बैठकीदरम्यान ह्युंदाईच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणुकीची माहिती दिली तसेच पुणे प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
