Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जावली तालुक्यातील उभरते नेतृत्त्व, सौरभबाबा शिंदे

जावली तालुक्यातील उभरते नेतृत्त्व, सौरभबाबा शिंदे

जावली तालुक्यातील उभरते नेतृत्त्व, सौरभबाबा शिंदे

पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.

जिसमे मिला दो उस जैसा

जावली तालुक्यातील दमदार, उभरते नेतृत्त्व सन्मा श्री सौरभ शिंदे यांना वरील गाण्यांच्या पंक्ती तंतोतंत लागू होतात. कुडाळच्या शिंदे घराण्याला राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील मोठा इतिहास आहे. स्वर्गीय लालसिंगराव शिंदे (काका) यांच्यापासून चालू झालेला हा प्रवास आता त्यांचे नातू सौरभ शिंदे यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत. राजकीय वारसदारांचा विषय येतो, तेंव्हा अनेकांना वाटते की त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आणि सुलभ आहेत. पण प्रत्यक्षात तसे नसते. त्यांचा राजकारणातील प्रवेश भलेही सोपा असेल, पण तिथून पुढची वाटचाल ही तितकीशी सोपी नव्हती. लालसिंगराव काका यांचा जमाना ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राजेंद्र शिंदे यांचा जमाना हा ९० च्या दशकाचा होता. ब्लॅक अँड व्हाईट आणि कलरफुल युग आणि त्यानंतर आलेले इंटरनेटचे युग या परिवर्तनाचे ९० चे दशक म्हणजे साक्षीदार आहे. 

 

त्यानंतर या इंटरनेटच्या युगात नवीन विचार घेऊन एक नवयुवक राजकारणात आला. त्याच्याबरोबर त्याच्या विचारांची पिढी तर होतीच, पण त्याअगोदरच्या दोन पिढीतील कार्यकर्त्यांची जबाबदारी सुद्धा होती. एक जुनी पिढी जी आजोबांच्या बरोबरीने कार्यरत होती. दुसरी वडिलांच्या काळातील मध्यमवयीन पिढी आणि तिसरी आत्ताची नव्या दमाची पिढी. या तीन विचारांच्या, तीन पिढ्यांना त्यांच्या त्यांच्या आदर, सन्मानासह कुणालाही न दुखावता सोबत घेऊन काम करताना किती दमछाक होत असेल हे सौरभ बाबाच सांगू शकतील. लालसिंगराव काका आणि राजू काका यांच्या यशस्वी कारकिर्दीशी आणि नेतृत्त्वाशी तुलना होणारच होती. ती टाळता येणे शक्य नव्हते. राजकारणाची मुहूर्तमेढ लालसिंगराव काकांनीच रोवली. त्यामुळे त्यांची तुलना कुणाशीच होणार नव्हती. राजू काकांचे नेतृत्त्व लालसिंगराव काकांच्या छत्रछायेत विकसित झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ते ही सुरक्षित झाले. 

 

पण सौरभ बाबांचा राजकारणातील प्रवेश हा अपेक्षांच्या ओझ्यासाहित झाला. त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला आजोबा लालसिंगराव काका नव्हते आणि पाठीवर हात ठेवायला वडील राजू काकाही नाहीत. पूर्वजांची पुण्याई आणि आई सुनेत्रताई शिंदे यांचा आशिर्वाद या शिदोरीवरच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. हा राजकीय प्रवेशही तितका सोपा नव्हता. त्यावेळी तालुक्यात त्यांच्या समोर राजकारणातील दिगग्ज होते. पण त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. पाण्यातील माशाचे अश्रू दिसत नाहीत, तसेच राजकारणातील नेत्यांचे दुःख कधी कुणाला दिसत नाही. त्यांना ते दाखवताही येत नाही. त्यांचे अवघे जीवन हे जनमाणसाशी जोडलेले असते. लोकांच्या सुख, दुःखात त्यांचे सुख, दुःख असते. जनता हसली की त्यांना हसावे लागते. जनता रडत असेल, तर यांच्याही डोळ्यात पाणी येते. स्वतःच्या आत काय जळतेय हे दाखविण्याची त्यांना परवानगी नसते. 

 

सुरुवातीला शरद पवार, अजितदादा राजकारणातील या दादा लोकांच्या तालमीत सौरभ बाबा तयार झाले. राजकारणातील बारकावे तेथे त्यांना शिकायला मिळाले. सहकारातील ज्ञान त्यांना मिळाले. जनसंपर्क कसा तयार करायचा? तो वाढवायचा कसा हे सगळे शिकल्यानंतर, सौरभ बाबा सातारा जिल्ह्याचे नेते, तरुण, तडफदार आमदार आणि आत्ताचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बरोबरीने राजकारणातील मोठी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाले. 

 

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, विश्वासू म्हणून काम करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बाबांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संगतीने प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात जम बसवायचा तर तगडा जनसंपर्क आणि सहकार या दोन गोष्टी आवश्यक आहेत. सौरभ बाबांनी नेमके हेच हेरले आणि या दोन्हींवर लक्ष केंद्रित केले आणि केवळ कुडाळ जि. प. गटापुरते मर्यादित न राहता संपूर्ण तालुका हाच मतदारसंघ मानून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जनसंपर्क वाढवला, तरुणांचे संघटन केले आणि आपल्या विचारांची एक भक्कम फळी उभी केली. 

 

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या मतदारसंघाचे नेतृत्त्व करत असताना मतदारसंघातील जनतेची ताकत भक्कमपणे त्यांच्या मागे उभी करण्याची मोठी जबाबदारी सौरभ बाबा यशस्वीपणे पार पाडत आहेत. हे करत असताना त्यांनी कधी कुणाही सोबत दुजाभाव केला नाही. तो आपला, तो परका असले गट-तटाचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. त्यामुळे तरुण, आबाल-वृद्ध यांच्या मनात सौरभ बाबा यांच्याबद्दल एक विश्वासाची भावना तयार झाली. त्यांचे व्यक्तीमत्त्व एक आश्वासक व्यक्तीमत्त्व आहे. त्यांचा AURA काही वेगळाच आहे. त्यांच्या सानिध्यात आलेला माणूस त्यांचाच होऊन जातो. एवढी magnetic power त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. 

 

त्यांचे हसणे, बोलणे, वागणे यातून जी विनम्रता दिसून येते, त्यावरून लक्षात येते की ते किती जमिनीवर राहून काम करतात. एका व्याख्यानात वपु म्हणतात नसलेले अवसान आणता येते. पण असलेली ताकत विसरायला फार मोठं मन लागते. इथं तीन पिढ्यांपासून घरात राजकारण आहे. एवढा मोठा वारसा असल्यावर माणसाला हवेत जायला कितीसा वेळ लागला असता? पण मन मोठे आहे. बरोबर संस्कार आहेत. सौरभबाबा हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातीत विकसित झालेले नेतृत्त्व आहे. रांगोळीचा कण कुठेही पडला, तरी तो त्याचे अस्तित्त्व घेऊन पडतो. त्याचप्रमाणे सौरभ बाबांचे नेतृत्त्व हे उठून दिसतेच आहे. त्याला अजून झळाळी प्राप्त होईल. ही तर सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आज बाबांचा वाढदिवस साजरा होतोय. उमद्या मनाच्या उमद्या तरुण, तडफदार नेतृत्त्वाला आजच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

धन्यवाद 

-किशोर बोराटे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 73 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket