एकुमॅ च्या नोंदी व पत्नीचे सातबाऱ्यावर नाव तसेच वारस नोंदी करून घ्याव्यात – तहसीलदार हनुमंत कोळेकर
सुकर जीवनमान अंतर्गत शासनाचा शंभर दिवसांचा कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
केळघर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कार्यक्रमातील सुकर जीवनमान या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण – 2025 / प्र.क्र. 7/र. व. का.
दि. 13/1/2025 शासन निर्णयान्वये शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असुन त्यामधील सुकर जीवनमान अंतर्गत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी शेतजमीनीचे 7/12 सदरी असलेल्या एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंदी कमी करणे, मयत खातेदार यांचे वारस नोंदी करणे, लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत पतीचे खात्यामध्ये
समाईकात पत्नीचे नाव दाखल करणे इत्यादी कामकाज करणेबाबत निर्देश दिले असून जावली तालुक्यातील नागरिकांनी या कृती आराखड्यात सहभागी होऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी केले आहे
एकत्र कुटुंब मॅनेजर ही संज्ञा कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब मॅनेजर यांनी अर्ज करायचा असून अर्जासोबत एकत्र कुटुंब मॅनेजर दाखल झालेबाबतचा फेरफार, जमीनीचे 7/12 उतारे इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.
वारस नोंद करण्यासाठी वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र, मयत खातेदाराचा मृत्यृचा दाखला,शेतजमीनीचा 7/12, खाते ऊतारा इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत.लक्ष्मी मुक्ती योजने अतंर्गत पत्नीचे नाव 7/12 सदरी दाखल करणेकामी, 7/12 सदरी नाव दाखल असलेल्या खातेदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, जमीनीचे 7/12 व खाते ऊतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
जावली तालुक्यातील सर्व नागरीकांना आव्हान करणेत येत आहे की,जिल्हाधिकारी सातारा व उपविभागीय अधिकारी सातारा यांनी दिलेल्या निर्देशानुसार वारस नोंदी, एकत्र कुटुंब मॅनेजर संज्ञा कमी करणे व लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शेतजमीनीचे 7/12 सदरी पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे अर्ज करावा.असे आवाहन तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी केले आहे
