राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोलापूर शहरच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
सोलापूर : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष (NCP) व चिन्हाबाबतचा निकाल अजित पवार गटाच्या (Ajit Pawar group) बाजूने दिला. यामुळे शरद पवार गटाला (Sharad Pawar group) जोरदार धक्का बसला असून शरद पवार समर्थक आक्रमक भूमिका घेत आहे. सोलापूरमध्ये देखील या निर्णयाचे (EC On NCP Decision) तीव्र पडसाद उमटताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोलापूर शहरच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनावेळी सोलपूर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. चार हुतात्मा तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली. पक्षाचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली हे पहिले आंदोलन करण्यात आले. सर्व समर्थकांनी काळ्या फिती बांधून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. खऱ्या पक्षाच्या विरोधात पक्षपाती, हुकुमशाही पध्दतीने निकाल दिला, पंचवीस वर्षाचा पक्ष हिसकावून घेतला. त्यामुळे केंद्र सरकारच्या हातातले बाहुले बनलेले असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी निवडणूक आयोगाचा धिक्कार करत ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार शरद पवार’ व ‘शरद पवार साहेब हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या.
