रात्र गस्तीमुळे परळी खोऱ्यात शिकारीला बसला आळा
सातारा प्रतिनिधी-सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या परळी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असून येथे भेकर, सांबर, रानडुक्कर तसेच इतर वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारासह आजूबाजूचा परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण भागात वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी वन विभागामार्फत सध्या नियमित रात्र गस्त सुरू करण्यात आली आहे.
वन विभागाच्या या कडक रात्र गस्तीमुळे शिकारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये चांगलाच धसका बसला असून शिकारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यासोबतच गावोगावी बैठका घेऊन बिबट व वन्यजीव जनजागृती केली जात असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
याबाबत स्थानिक नागरिक मनोज देवरे यांनी सांगितले की,
“आमच्या भागात वन विभागामार्फत मिटिंग व जनजागृतीचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. नियमित रात्र गस्त सुरू असल्याने शिकारीचे प्रमाण जवळपास बंद झाल्यासारखे आहे.”
वनपरीक्षेत्र अधिकारी सातारा श्री.संदीप जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक जयंत निकम, प्रकाश शिंदे व तुषार लगड हे अधिकारी-कर्मचारी नियमितपणे रात्र गस्त घालत असून त्यामुळे वन्यप्राण्यांचे संरक्षण अधिक भक्कम झाले आहे.वन विभागाच्या या प्रभावी कारवाईमुळे परळी खोऱ्यातील जंगल व वन्यजीव सुरक्षिततेकडे एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे.




