दुष्काळमुक्तीचे वेडेपण माझ्यात आहे-आ.जयकुमार गोरे
विधानपरिषदेचे आमदार असताना ज्यांना आमदार फंड खर्च करता आला नाही, ज्यांनी कधी पाणीचळवळीत भाग घेतला नाही, ज्यांना मतदारसंघातील गावेही माहित नाहीत, कोणत्याही गावात ज्यांनी कधी एखादे विकासकाम केले नाही आणि जे बारामती, फलटनकरांच्या चाकरांचे म्होरके झालेत त्या प्रभाकर घार्गेंनी माण – खटाव मतदारसंघाच्या विकासाच्या थापा मारु नयेत. त्यांची क्षमता नसताना मोठमोठ्या बाता मारु नयेत असे प्रतिपादन आ.जयकुमार गोरे यांनी केले.
माण तालुक्यातील गावभेटीदरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, माण – खटावच्या पाणीयोजना पूर्णत्वाकडे निघाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून माण तालुक्यात तब्बल १७० किलोमीटर लांबून उरमोडी योजनेचे पाणी माण तालुक्यात येत आहे. आता जिहेकठापूरचेही पाणी आले आहे. टेंभूची कामे सुरु झाली आहेत. माझ्या विरोधातील उमेदवार प्रभाकर घार्गेंचे पाणीचळवळीत कधीच योगदान नव्हते. ते पाणी योजनांसाठी काहीच करु शकत नाहीत, मात्र जनतेला भूलथापा देत वल्गना करत आहेत. लबाडाघरचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नसते हे जनतेला चांगलेच माहित आहे. मी माझ्या कुटुंबाचा विचार न करता माझ्या मतदारसंघाचा, इथल्या जनतेचा आणि मातीचा विचार केला. झपाटून कामे करत गेलो. दुष्काळमुक्तीचे वेडेपण माझ्यात आहे. माझ्या मायबाप जनतेचे आणि स्वाभिमानी मातीचे पांग फेडण्यासाठी मी काहीही करायला तयार असतो. मी छ. शिवाजी महाराजांचा मावळा आहे, त्यामुळे जातीपातीचे राजकारण माझ्या रक्तातच नाही. विरोधक मात्र गावागावात, जाती जातीत आणि आता तालुक्या तालुक्यात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.
आ. गोरे पुढे म्हणाले, घार्गेंनी त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत खटाव तालुक्यासाठी काहीच केले नाही. माण तालुक्यात तर त्यांची ओळखही नाही. लोकप्रतिनिधीकडे विकासकामे करण्याचे जे व्हिजन लागते ते त्यांच्याकडे नाही. सहा वर्षात ते विधानपरिषदेचा फंडही खर्च करु शकले नव्हते. ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल असणाऱ्यांनी, शेतकऱ्यांच्या ऊसाचा काटा मारुन त्यांना देशोधडीला लावणाऱ्यांनी बोलताना जरा भान ठेवावे असेही आ.गोरे शेवटी म्हणाले.
माण – खटावचा मूलभूत विकास साधत इथला दुष्काळी कलंक पुसण्याचे उद्दिष्ट ठेवून मी काम करत आलो आहे. मी माझ्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करत असताना विरोधी उमेदवार प्रभाकर घार्गेंना मतदारसंघाशी काहीच देणेघेणे नाही. २०१९ ला मतदारसंघ वेगळा झाल्यावर त्यांना जावयाला आमदार करायचे आहे. त्यासाठी त्यांची तयारी सुरु आहे. त्यांना मतदारसंघाचा नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचा विकास साधायचा आहे. म्हणूनच त्यांनी माण – खटावला वेठीस धरले आहे असे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.