डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत महाबळेश्वर शहरात भव्य महास्वच्छता अभियान
महाबळेश्वर (सातारा): महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर शहरात भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, विहिरी व नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येतात.
रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता महाबळेश्वर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
या शहर स्वच्छता अभियानामध्ये महाबळेश्वर शहरासोबत महाराष्ट्रातील तसेच देशात व परदेशात देखील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या शहर स्वच्छता अभियानामध्ये कोळी आळी, गवळी मोहल्ला, नगरपालिका सोसायटी, मरीपेठ, स्कूल मोहल्ला, मुख्य बाजारपेठ, पोलीस स्टेशन कार्यालय, एस.टी स्टँड, नगरपालिका कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानामध्ये सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
