डॉ. रविंद्र भोसले यांची राज्यस्तरीय सल्लागार समितीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ नाशिक यांचेकडून सहकार पदविका शिक्षणक्रमासाठी तज्ञ सल्लागार म्हणून निवड
डॉ. रविंद्र भोसले हे १९८९ पासून वैदयकीय व्यावसायिकांच्या उन्नतीसाठी सहकाराच्या माध्यमातून धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून कार्यरत आहेत. तसेच सहकार भारती या संघटनेची निगडित असून ते सातारा जिल्हाध्यक्ष या पदावरही कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील १६००० नागरी पतसंस्थांची शिखर संस्था असणाऱ्या व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मध्ये संचालक म्हणून कार्यरत असून पतसंस्था च्या समस्या, प्रश्न, अडचणी निराकरणासाठी फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वात कार्यरत असून सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन, सातारा अशा सहकारातील विविध संस्थांचे ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा व राज्य पातळीवरील संचालक म्हणून कर्तव्य भावनेने वैशिष्ट्यपूर्ण कार्य संस्कृतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदाना स्वरूप त्यांची राज्यस्तरीय सल्लागार समितीवर सहकार पदविका आभ्यासक्रमासाठी नुकतीच नियुक्ती झाली आहे ही निवड एका अर्थाने त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यकर्तृत्वावर शिक्कामोर्तब होण्याप्रमाणेच त्यांच्या कार्याला पदाचे कोदणं लाभल्याचे दिसून येते.
सहकार संक्रमण काळात पतसंस्था समोरील आव्हाने, आवर्तने याला सक्षमपणे सामोरे जात सहकार क्षेत्रात विविध पदाच्या माध्यमातून हे शिवधनुष्य पेलण्याची, या पदाला न्याय देण्याची कामगिरी पराकोटीच्या कर्तव्य भावनेने, मनोभावे श्रम, समय, सेवेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक ते आज पार पाडीत असून प्रगती, सहकाराच्या विचारधारेची कास धरीत, सहकाराची, समृद्ध परंपरा जतन करीत, “सहकारीता सत्फलाय ” या संकल्पनेतून समाजऋण फेडण्याचे सहकार हे सक्षम साधन समजून सहकार साधना निरंतर ठेवत विधायक अर्थकारणाबरोबरच सजग समाजकारणाचा एक आदर्शवत मौलिक वस्तूपाठ अन्य संस्था समोर घालून दिल्याचे वास्तव म्हणावे लागेल.
त्यांच्या या निवडीबद्दल राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काका कोयटे व सर्व संचालक मंडळ, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे सर्व संचालक मंडळ, धन्वंतरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे व सर्व संचालक मंडळ यांनी हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
