डॉ.नितीन सावंत यांच्या नेतृवात लोणंदमध्ये १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत शरद कृषी महोत्सव
देशाचे नेते खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सातारा -लोणंद येथील पालखी तळ मैदानावर डॉ.नितीन सावंत विचार मंचच्या वतीने दि. १ते ५ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील भव्य राज्यस्तरीय सहावे शरद कृषी महोत्सव प्रदर्शन व शेतकरी मेळावा होत आहे. या कृषी महोत्सवाचे उद्घाटन रविवार दि. २ रोजी दुपारी खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती डॉ. नितीन सावंत यांनी दिली.
लोणंद येथील बाजार तळावरील शरद कृषी महोत्सवाच्या मंडप कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. नितीन सावंत, नगरसेविका तृप्ती घाडगे, शैलजा खरात, अॅड. पुरुषोत्तम हिंगमिरे, दिलीप घाडगे, किसनराव धायगुडे, मस्कूआण्णा शेळके, सोपान क्षीरसागर, रघुनाथ शेळके, प्रदीप होळकर, किसन धायगुडे राजू इनामदार, अविनाश नलावडे, हेमंत निंबाळकर, शंभूराज भोसले व मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाची माहिती देताना डॉ.सावंत म्हणाले, प्रदर्शनात पहिल्या दिवशी विविध शाळातील मुली वृक्षदिंडी काढणार आहेत. कृषी विभागाच्या वतीने फळांची पीक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशु पक्षी यांची स्पर्धा होणार आहेत. रविवार, दि. २ रोजी दुपारी १.३० वाजता शरद कृषी महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने भाजीपाला पिकाची स्पर्धा होणार आहे. सर्वांत लहान म्हैस खास आकर्षण राहणार आहे.
दि.३ फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खिलार बैल, कोंबडा हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कृषी विभागाच्यावतीने ऊस या पिकाची पीक स्पर्धा होणार आहे. सायंकाळी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी युथ फेस्टिव्हल कार्यक्रम होणार आहे. आ. रोहित पवार व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कृषी विभागाच्यावतीने फुले यांची पीक स्पर्धा, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शेळी, मेंढी, घोडा पक्षी यांची स्पर्धा होणार आहे. दि.५ रोजी शरद कृषी महोत्सवाचा समारोप व सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत.कार्यक्रम, बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी प्रदर्शन उपयोगी पडत आहे लोणंदच्या व्यापाऱ्यातही मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. या प्रदर्शनात सुमारे तीनशे पेक्षा जास्त स्टॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचेही डॉ.सावंत यांनी सांगितले.
