दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही किणी टोल नाक्यावरील घटना
रविवारी सकाळी साडेसातची वेळ किणी टोल नाक्यावरील बुथ क्रमांक सहावर एसटीबस टोल भरण्यासाठी थांबली, पाठोपाठ कार थांबली, इतक्यात पाठीमागून नियंत्रण सुटलेला कंटेनर कारवर आदळला. त्यामुळे कार पुढील एसटी बसवर आदळली. यानंतर कंटेनर लेनवरच पलटी झाला..बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही.
खरोखरच काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या अपघाताने दैव काय असते हे दाखवून दिले. फलटणच्या साखरवाडी येथील रोहित मदने, अनिल मोठे, सोहन भापकर हे तिघेजण मारुती अल्टो कार मधुन फलटणहुन आदमापूर येथे बाळुमामांच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास ते किणी टोल नाक्यावर आले. कारच्या पुढे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी एसटी बस टोल भरण्यासाठी थांबली होती. कारही पाठोपाठ येऊन थांबली. इतक्यात पुण्याकडून बंगलोरला निघालेल्या भरधाव असणाऱ्या कंटेनर च्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत पुढे उभ्या असणाऱ्या कारला जोराची धडक दिली आणि लेनमध्येच पलटी झाला. अर्धी कार पुढे असणाऱ्या एसटी बसच्या खाली जाऊन घुसली.
कारच्या मागील पुढील अशा दोन्ही बाजूंचा चक्काचूर झाला. टोल नाक्यावर पळापळ सुरू झाली. अंदाज घेत बचाव कार्य सुरू झाले. एसटी खाली गेलेली कार बाहेर काढण्यात आली.अन आश्चर्य म्हणजे कार मधील तिघांपैकी एकालाही साधे खरचटलेही नव्हते. मात्र भयभीत झालेल्या या तिघांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. केवळ आभाळाकडे हात जोडत आम्हाला मामांनीच वाचविल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नाक्यावर आधीच गर्दी होती. त्यातच हा अपघात घडल्याने वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
