असंघटित कामगारांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलजावणी करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडील विविध योजना समाजातील वंचित व गरीब असंघटित, घरेलू कामगार वर्गांसाठी आहेत. त्यांच्यासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणी करुन प्रत्येक लाभार्थ्याला लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडील विविध योजनांचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कावले, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यात किती बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे याची माहिती घेऊन बांधकाम कामगार नोंदणी नुतनीकरणाचा आढावा घेतला. यावर जिल्ह्यात 88 हजार कामगारांची नोंदणी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या नुतनीकरणाचे काम संत गतीने सुरु आहे. प्रत्येक बांधकाम कामगाराचे नुतनीकरण झालेच पाहिजे. यासाठी विविध शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजन करा. एकही बांधकाम कामगार नुतनीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी विविध योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवून किती जणांना योजनेचा लाभ दिला याची आकडेवारी पुढील बैठकीत द्यावी. योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे हे संबंधित विभागाचे कर्तव्य असून या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिला.
घरेलू महिला कामगारांसाठीही योजना आहेत. या महिलांच्या पहिल्या प्रसुतीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, याचा जास्तीत जास्त घरेलू महिला कामगारांना लाभ द्यावा. यासाठी विविध संघटनांसोबत बैठक घेऊन गभर्वती मातांची यादी शासकीय रुग्णालयांना द्यावी.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना व विट भट्टीवर एकही बाल कामगार आढळणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व आस्थापना व विट भट्टींची वेळोवेळी पथकांमार्फत तपासणी करावी. भविष्यात बाल कामगार ठेवणार नाही असे हमीपत्रही त्यांच्याकडून भरुन घ्यावे. पुढील बैठकीत सहायक कामगार आयुक्त कार्यालकडील विविध योजनानिहाय देण्यात आलेल्या लाभाची लाभार्थ्यांच्या माहिती सादर करावी, असे निर्देश देऊन माथाडी कामगारांच्या विविध योजनांचाही आढावा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घेतला.




