धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. रविंद्र भोसले यांना ‘डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
सातारा : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. रविंद्र नामदेव भोसले यांना सन २०२४-२०२५ करीताचा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. होमिओपॅथी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि समाजातील आरोग्य सेवेसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. रविंद्र भोसले यांनी १९७९ साली होमिओपॅथीक डॉक्टर म्हणून सातारा येथे प्रॅक्टीस सुरू केली. गेल्या ४६ वर्षात अनेक जुनाट, दुर्धर, आजारावर होमिओपॅथीक औषधोपचार करून रोग्यांना रोगमुक्त केले व आजही हे उपचार देण्याचे कार्य सुरू आहे.डॉ.रवींद्र भोसले यांनी आपल्या वैद्यकीय, शैक्षणिक कारकिर्दीत असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य पदाची धुरा ३५ वर्ष यशस्वीपणे सांभाळली व होमिओपॅथीच्या प्रचार व प्रसार याठी आपले आयुष्य वेचले. होमिओपॅथी हाच त्यांचा ध्यास व श्वास ठरला. त्यांनी अनेक नवोदित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. शैक्षणीक क्षेत्रात कॉलेजच्या मधयमातून २००० पेक्षा अधिक डॉक्टर घडवले जे आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यात गरजू रूग्नांना दवाखाना व हॉस्पीटलच्या माध्यमातून सेवा देत आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेगवेगळया प्राधीकरणावर पदाधिकारी म्हणून आजही डॉ.रविंद्र भोसले कार्यरत आहेत अनेक विद्यापीठात DHMS, BHMS, MD, Phd च्या विद्दार्थ्यांना परिक्षक म्हणून, मार्गदर्शक म्हणून काम केरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून होमिओपॅथीक क्षेत्रात देशामध्येही लेखक म्हणून नांव मिळविले आहे. Classical Science हे होमिओपॅथीचे मासिक दरमहा प्रसिध्द केले जाते सदर मासिकेचे ते संपादक आहेत. गेली १५ वर्ष हे मासिक सातारा येथून प्रसिध्द होते व Peer Reviewed Jourmal म्हणून मान्यता मिळविली आहे.
त्यांनी होमिओपॅथी क्षेत्राच्या संशोधनासाठीही भरीव व मोठे काम केले आहे, ३०च्या वर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत तसेच ३ डॉक्टरांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग घेतला आहे.
केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सहकार क्षेत्रातही डॉ. भोसले यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. सहकार भारती, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकारी संस्थांच्या विकासासाठी योगदान दिले आहे तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनवर ते पश्चिम महाराष्ट्रातून संचालक म्हणून काम करीत आहेत, सहकाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे, सहकारी संस्थांच्या माध्यमातून पारदर्शक व्यवस्थापन आणि आर्थिक सक्षमता याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.
डॉ.भोसले हे धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा चे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक डॉक्टरांना, सभासदांना आर्थिक मदत केली आहे. त्यांची दूरदृष्टी आणि सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह राहत आहे. तसेच याचे फलित म्हणून शासनाच्या सहकार विभागाकडून “सहकार भूषण” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संस्थेस मिळाला आहे.
डॉ. भोसले हे सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे दिल्ली (CCH Delhi) वर सदस्य म्हणून २००६ व २०१४ मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी ते निवडून गेले होते व त्यांनी त्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांनी देशातील होमिओपॅथी शास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याबरोबर शैक्षणी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्याचे कार्य कोले आहे. होमिओपॅथीच्या नियमावली, शिक्षण प्रणाली आणि व्यावसायिक नैतिकता यासंदर्भात त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे. होमिओपॅथीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. याशिवाय होमिओपॅथीची मोफत तपासणी व औषधोपचार शिबीरे राज्यभर घेवून होमिओपॅथीचा प्रसार व प्रचार केला आहे.
त्यांच्या या सन्मानामुळे सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. धन्वंतरी पतसंस्थेचे संचालक व सेवक, राज्य फेडरेशनचे व सहकार भारतीचे पदाधिकारी, होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजचे संस्था चालक, प्राचार्य, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ विविध सहकारी संस्था, आणि त्यांचे विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा पुरस्कार त्यांना मिळाल्याने सातारा जिल्ह्यासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.
डॉ. भोसले यांचे कार्य नव्या पिढीतील डॉक्टर आणि सहकार कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे, त्यांनी सहकार आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार आणि वैद्यकीय क्षेत्र अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
