देऊर महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
सातारा -मराठी भाषा गौरव दिनाबरोबरच मराठी भाषा अभिजात भाषा गौरव दिन महाविद्यालयीन स्तरावरून साजरा करताना मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन आपण केले पाहिजे. मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतिक आहे. मराठी भाषेच्या या दैदिप्यमान संस्कृतीचा आणि अस्मितेचा वसा व वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या महाविद्यालयीन तरुणाईवर आहे, असे प्रतिपादन प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊरचे प्राध्यापक सुर्यकांत अदाटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. चंद्रशेखर भारती यांनी करून दिली.
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे मराठी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. या दर्जामुळे मराठी भाषेच्या अभ्यास, संशोधन, आणि साहित्यिक कार्याला प्रोत्साहन मिळेल. यामुळे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि तिचा विकास होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातही ही भाषा समृद्ध राहील. अभिजाततेचा दर्जा मिळाल्याने मराठीची जागतिक स्तरावर ओळख वाढलेली आहे. त्यामुळे आपण अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठीचे वैभव वाढविण्यासाठी आपण सशक्त प्रयत्न केले पाहिजेत.
मराठीचे अभिजात स्वरूप आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करताना आपण निबंध, वक्तृत्व स्पर्धाबरोबरच साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजन करून मराठी भाषा वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रसार केला पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय शेडगे म्हणाले कि मराठी भाषा केवळ एक संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने संशोधन आणि अभ्यासाला चालना मिळून ग्रंथालयांचे सशक्तीकरण होईल. त्यामुळे आपण सर्वांनी मराठी भाषेचा स्वाभिमान जपला पाहिजे. आपण दिसामाजी काहीतरी लिहिले पाहिजे त्याचबरोबर मराठी भाषेचे वाचन वाढविले पाहिजे.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. दत्तू मेंगाळ यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रशेखर भारती यांनी केले. कार्यक्रमास डॉ. सुंदर पोटभरे, डॉ.कमलसिंग क्षत्रिय, प्रा. शितल बर्गे, प्रा.मनिषा दळवी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
