निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे म’श्वर निवडणूक लांबणीवर : कुमार शिंदे
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
महाबळेश्वर (प्रतिनिधी) : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद निवडणुकी संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तरीही आपण उमेदवारांना चिन्ह वाटप करून बेकायदेशीर काम करत आहात, असे सांगून देखील अपुऱ्या बुद्धीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी ही प्रक्रिया पार पाडली. राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही चुकीची बाब आम्ही आणून आल्यानंतर त्यांनी नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले. ज्या निर्बुद्ध अधिकाऱ्यांमुळे उमेदवारांचे आर्थिक नुकसान झाले. त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूर उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार आहे. तसेच जिल्हा न्यायालयाने उमेदवारां विरोधातील जी याचिका फेटाळली आहे त्यावरही उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहिती गिरिस्थान नगर विकास आघाडी (नियोजित) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार भाऊ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने महाबळेश्वर येथील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देऊन ही निवडणूक आता दि. २० डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे जनते मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या सर्व बाबींचा खुलासा करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार भाऊ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुकीला उभे असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डी.एम बावळेकर व सुनील शिंदे यांनी नगरपालिकेचा कर बुडवला आहे. त्याचे पुरावे देखील सादर केले. नियमानुसार थकबाकी असणारे उमेदवार निवडणुकीला पात्र ठरत नाही. याबाबत पुरावे देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. परंतु राजकीय दबावापोटी नगरपालिकेने त्यांना तुटपुंजी रक्कम भरायला लावून पावती दिली. परंतु या पावतीवर कोणताही जीएसटी चा उल्लेख नाही. दंड व्याज आकारणी नमूद नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली होती. ही कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना देखील निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मस्के व मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी उमेदवारांना चिन्ह वाटप केले. बेकायदेशीर प्रक्रिया या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे राज्य निवडणूक आयोगाला आम्ही कळवले. त्यांनी तात्काळ ही निवडणूक प्रक्रिया बंद पाडली.
आता दि.४ रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. दि.१० रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत, दि.११ रोजी आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे, दि. २० रोजी मतदान दि.२१ रोजी निकाल,असा हा नव्याने निवडणूक कार्यक्रम होणार असल्याचे कुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
सध्या अन्य ठिकाणी होत असणाऱ्या नगरपालिका निवडणुकांचा निकालांचा परिणाम येथील निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवावेत असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला देणार असल्याचे कुमार भाऊ शिंदे यांनी सांगितले.
तसेच जिल्हा न्यायालयाने फेटाळलेली याचिकेचे अपील कोल्हापूर उच्च न्यायालय दाखल करणार. व ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे उमेदवारांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांच्या विरोधातील याचीका ही कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे सांगितले.




