ज्ञान, नवोन्मेष आणि युवाशक्तीचा संगम… ‘उडान 25-26’!
नागपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने आयोजित ‘उडान 25-26 : ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन अवॉर्ड्स’ कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणतीही शैक्षणिक संस्था विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमुळे ओळखली जाते. एलआयटीमधून घडलेले विद्यार्थी हेच संस्थेचे खरे सामर्थ्य असून, ग्लोबल अल्युमिनाय मीटमुळे हा बृहद परिवार एकत्र येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असताना जागतिक दर्जाच्या मानव संसाधनांची गरज वाढत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देणे आवश्यक असून, गुणवत्तावृद्धीसाठी राज्य शासनाने दर्जेदार विद्यापीठांना स्वायत्ततेचा निर्णय घेतला आहे. याच प्रक्रियेत लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाला स्वायत्तता देण्यात आली असून, यामुळे भविष्यात अधिक सक्षम मानव संसाधन निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीची गरज अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने किमान 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये शैक्षणिक व संशोधन संस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
ऊर्जा संक्रमण, ग्रीन जॉब्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारांचे स्वरूप बदलत असून, अशा काळात एलआयटीसारख्या संस्था नवोपक्रमांची केंद्रे बनतील आणि भारताच्या विकासयात्रेत मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.



